पुणे – भिकारी भीक मागण्याचे सोडेनात

भिक्षेकरू केंद्रात समुपदेशनही करून काही परिणाम नाही

पुणे – भिकाऱ्यांनी भिक्षा मागणे बंद करावे म्हणून त्यांचे तब्बल पंधरा दिवस समुपदेशन केले. या दिवसांमध्ये त्यांच्या पालनपोषणाचीही जबाबदारी घेतली. विशेष म्हणजे समुपदेशन झाल्यानंतर आम्ही पुन्हा भिक्षा मागणार नाही, अशी शपथही घेतली. त्यामुळे समुपदेशन करणारे आणि शासकीय कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा निश्‍वास टाकला. विशेष म्हणजे एक चांगले काम केल्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मात्र, त्यानंतर घडले तेच वेगळेच. कारण पंधरा दिवस समुपदेशनाचा धडा घेतलेले भिक्षेकरू अवघ्या तासाभरातच भिक्षा मागण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरले. त्यामुळे केलेल्या कष्टावर पाणी पडल्याचा पश्‍चाताप या कर्मचाऱ्यांना झाला.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शहर आणि उपनगरांमध्ये भिक्षेकरूंचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढत चालले आहे. त्यामुळे समाजाची आणि शहरांचीही प्रतिमा मलिन होत चालली आहे. त्याची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या भिक्षेकरूंसाठी विश्रांतवाडी येथे आळंदी रस्त्यावर प्रशस्त असे भिक्षेकरू केंद्र उभारण्यात आले आहे. या भिक्षेकरूंना पकडण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून खास पथकांची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक या भिक्षेकरूंना पकडून या केंद्रात आणतात. त्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात केली जाते. मात्र, त्यांची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर ते भिक्षेकरू पुन्हा भिक्षा मागत असल्याचे या पथकांच्या निदर्शनास आले होते.

त्यामुळे या भिक्षेकरूंचे कायमचे पुनर्वसन करण्याचा निर्णय या केंद्राने घेतला होता. ही बाब लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या अनोख्या प्रस्तावाला राज्य शासनानेही तत्काळ मंजुरी दिली होती. त्यानुसार या केंद्रात समुपदेशन सुरू करण्यात आले होते. विशेष म्हणजे गेली पंधरा दिवस हे समुपदेशन सुरू होते. त्यामध्ये भिक्षा मागताना कशी अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे काय तोटा होतो आणि अन्य काही काय तोटा होतो यासंदर्भात त्यांना धडे देण्यात आले. विशेष म्हणजे या समुपदेशनाला तब्बल पाचशे भिक्षेकरूंचा सहभाग होता. या समुपदेशनाचे आणि भिक्षा न मागितल्याने काय फायदा होईल याचे महत्त्व सर्वांनाच पटले होते. या समुपदेशनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले. ते काय करतात हे पाहाण्यासाठी काही पथके त्यांच्या मागावर होती. त्यावेळी हे भिक्षेकरू त्यांच्या घरी न जाता पुन्हा भिक्षा मागण्यासाठी रस्त्यावर फिरत असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे, अशी माहिती भिक्षेकरू समुपदेशन केंद्राचे प्रमुख बी. जी. शिंदे यांनी दिली

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here