पुणे – पीएमपीचा सीएनजी पुरवठा खंडित?

एमएनजीएलचा इशारा : दोन वर्षांपासूनचे 48 कोटी रु. थकले


1,235 बसेसना फटका बसणार

पुणे – पीएमपी बसेसना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)चा पुरवठा दि. 24 मेपासून बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर, सरव्यवस्थापक सुजित रुईकर, मुख्य वाणिज्यिक अधिकारी एस.चंद्रमोहन, मुख्य व्यवस्थापक (वाणिज्य) मयुरेश गानू, सरव्यवस्थापक (मार्केटिंग) मिलिंद ढकोले आदी उपस्थित होते.

शहराची मुख्य सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या पीएमपीएमएलच्या सुमारे 1,235 बसेसना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीकडून सीएनजीचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, प्रशासनाकडून गॅस पुरवठ्याची रक्कम वेळोवेळी दिली जात नसल्याने, मागील दोन वर्षांपासून पीएमपीकडे 47.22 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी कमी करण्याबाबत पीएमपीएमएलकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने नाईलाजास्तव हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण थकबाकी मिळेपर्यंत हा पुरवठा सुरु करण्यात येणार नसल्याचा आक्रमक पवित्रा एमएनजीएलने घेतला आहे.

वारंवार शासनाच्या सर्व स्तरांवर पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्याबाबत कोणताही समाधानकारक प्रतिसाद किंवा कार्यवाही झाली नाही. पीएमपी प्रशासनाकडून अनुदान मिळत असल्याचे कारण सांगण्यात आले. पर्यायाने एमएनजीएलची देणी वाढत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलला सीएनजीचा पुरवठा बंद करण्यात येत आहे. याबाबत एमएनजीएलचे स्वतंत्र संचालक राजेश पांडे हे पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आणि महापौरांशी सतत संपर्कात आहेत, असे सोनटक्के म्हणाले.

पाच पंपांहून दिला जातो सीएनजी
चिखली, पिंपरी, कात्रज, हडपसर आणि नरवीर तानाजीवाडी या ठिकाणांहून पीएमपी प्रशासनाला सीएनजी पुरविण्यात येतो.

दररोज लागणारा सीएनजी – 60 हजार किलो


दररोज येणारा खर्च – सुमारे 30 लाख रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)