पुणे – पीएमपीएमएलला संचलन तूट देण्याला मंजुरी

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) सन 2018-19 या आर्थिक वर्षातील पुणे महापालिकेच्या वाट्याची 146.73 कोटी रुपये संचलन तूट देण्याला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

गेल्या आर्थिक वर्षात पीएमपीएमएलला 244.55 कोटी रुपये संचलन तूट आली होती. पुणे महापालिकेचा हिस्सा 60 टक्के आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हिस्सा 40 टक्के इतका आहे. त्यानुसार प्रतिमहा 12 कोटी रुपये याप्रमाणे येत्या आर्थिक वर्षात ही रक्कम पीएमपीएमएलला देण्यात येणार आहे.

पीएमपीएमएलच्या पत्रानुसार आर्थिक स्थिती बिकट असल्याने कामगारांचे पगार व इतर खर्च भागविणे अशक्‍य झाले होते. आचारसंहितेमुळे पीएमपीएमपीएमएलला रक्कम देता येत नव्हती. संचलन तुटीपोटी या आर्थिक वर्षात देण्याची रक्कम आगाऊ स्वरुपात एप्रिल आणि मे महिन्यात 24 कोटी रुपये देण्यात आली आहे.

मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी क्रमिक पुस्तके
पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांतील शाळा आणि रात्रशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके देण्यास स्थायी समितीने मंजुरी देण्यात आली आहे. मराठी माध्यमामध्ये नववी आणि दहावीचे विद्यार्थ्यांना 91 हजार 872 आणि रात्रशाळांतील विद्यार्थ्यांना अडीच हजार पुस्तकांची आवश्‍यकता आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळाकडून (बालभारती) पुस्तके खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी 48 लाख 93 हजार 555 रुपये देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)