पुणे – जलवाहिनी फुटल्याने भीती आणि नासाडी

जनता वसाहत परिसरातील सात घरांचे नुकसान


कालवाफुटीच्या आठवणी पुन्हा झाल्या जाग्या

पुणे – पर्वती जलशुद्धीकरण केंद्रामधून पद्मावती पंपिंग स्टेशनला पाणी पुरवठा करणारी सुमारे 18 इंच व्यासाची जलवाहिनी शुक्रवारी मध्यरात्री फुटली. यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून जनता वसाहतीमधील जवळपास सात घरांचे नुकसान झाले. दरम्यान, यामुळे या प्रकारामुळे कालवाफुटीच्या घटनेची आठवण झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

पर्वती टेकडीमागील बाजूस असलेल्या जनता वसाहतीमध्ये गल्ली क्रमांक 29समोरच्या घरांखालून 18 इंच व्यासाची जलवाहिनी गेली आहे. ती 30-40 वर्षे जुनी आहे. ही जलवाहिनी फुटल्याने जयवंत काशिद यांच्या घरात जमिनीखालून पाण्याचा लोंढा वर आला. फरशीमधून पाणी वर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, झोपेत असल्याने कोणाच्याही ते लक्षात आले नाही. पाण्याचा प्रवाह वाढताच भूकंप झाल्याप्रमाणे जमिनीखालून पाण्याचा फवारा वर आला. त्याचा वेग एवढा होता, की त्यामुळे काशिद आणि त्यांच्या पत्नी संगीता बाजूला फेकले गेले. दरवाजे बंद असल्याने त्यांच्या घरातच पाणी साठण्यास सुरूवात झाली आणि काही समजण्याच्या आतच घरातील वस्तू तरंगू लागल्या. त्यामुळे काशिद यांनी घरातील व्यक्तींसह आरडाओरडा केला. त्यानंतर मदतीला स्थानिक धावून आले. त्यांनी दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढले. त्यानंतर हे पाणी आसपासच्या सहा ते सात घरांमध्ये घुसले.

या दुर्घटनेत संगीता भरत काशिद, जयश्री विशाल चव्हाण, प्रशांत गणपत प्रभू, विजय बापू जाधव, रेखा रमेश जाधव, महेश सुरेश जाधव, उमेश भागोजी चव्हाण आदींच्या घरांचे नुकसान झाले. सर्वांनी जमेल तितके साहित्य वाचविण्याचा प्रयत्न केला असला, तरी, या घटनेमुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

पोलिसांची तातडीची मदत
घटनेची माहिती मिळताच दत्तवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, कर्मचारी कुलदीप सपकाळ आदी घटनास्थळी धावले. त्यांनी चिखल तुडवित सर्व राडारोडा बाहेर काढण्यास सुरुवात केली. स्थानिक कार्यकर्त्यांनीही धाव घेत तत्काळ महावितरणशी संपर्क साधून वीज प्रवाह बंद केला. तसेच पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून पाणी बंद करण्यात आले. पीडितांची जवळच्याच अंगणवाडी आणि समाजमंदिरामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली.

आम्ही झोपलेलो असताना जमिनीखालून पाण्याचा जोरदार फवारा उडाला. त्यासोबत आम्ही वर उडालो. घरामध्ये पाण्याची पातळी वाढत होती. आरडाओरडा केल्यावर स्थानिक लोक आले. दरम्यान, घराची भिंत कोसळल्यामुळे पाणी वाहून गेले. आम्हाला सर्वांनी बाहेर काढले. अन्यथा आमच्यावर काळच आला होता.
– संगीता काशिद, पीडित

दुरुस्तीचे काम सुरू
महापालिकेने या जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. सुमारे 2 ते 3 फूट जमिनीखाली ही जलवाहिनी आहे. त्यातच, घरातील साहित्यही पडलेले असल्याने आधी ते बाजूला घेण्यात आले असून त्यानंतर खोदाई सुरू करण्यात आली. हे काम होण्यासाठी उशीर लागणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यामुळे कोठेही पाणी पुरवठा विस्कळीत होणार नसून पद्मावती जलकेंद्रासाठी आणखी एक बायपास जलवाहिनी आहे. त्यातून पाणीपुरवठा सुरळीत केल्याचे प्रशासनाने स्पष्ट म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)