पुणे – महेश प्रोफेशन फोरम (एमपीएफ) तर्फे आयोजित एमपीएफ बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेत पुरूष गटात सन सुपर किंग्ज्, तर महिला गटात झोरीया एन्जल्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
राजयोग लॉन्स्, मार्केटयार्ड येथे झालेल्या स्पर्धेच्या पुरूषांच्या गटात संदीप काब्राच्या 40 धावांच्या जोरावर सन सुपर किंग्ज् संघाने बीएमसी फायटर्स संघाचा 29 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.
सन सुपर संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 8 गडी गमावून 104 धावा केल्या. यामध्ये संदीप काब्रा याने 17 चेंडूत 2 षटकारांसह 40 धावा करून संघाला शंभर धावांचा टप्पा गाठून दिला.
या आव्हानाचा पाठलाग करताना बीएमसी फायटर्स संघाचा डाव 8 षटकांत 75 धावांवर आटोपला. बीएमसी संघाच्या अमोल मर्दा 30 व अजय झंवर 12 यांनी संघाचा पराभव वाचवण्याचा प्रयत्न केला. सन संघाच्या भावेश पांफलिया (3-15) व अमित परतानी (2-10) यांनी चमकदार गोलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी पार पाडली.
महिला गटामध्ये श्रध्दा सारडा हिच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर झोरीया एन्जल्स् संघाने पर्व डायमंडस् संघाचा 36 धावांनी सहज पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. झोरीया संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 षटकांत 3 गडी गमावून 71 धावा केल्या. यामध्ये श्रध्दा सारडा 28 धावा व वीना माळू 25 धावा यांनी संघाच्या डावाला आकार दिला.
पर्व डायमंडस् संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव 6 षटकांत 35 धावांवर आटोपला. गोलंदाजीमध्ये झोरीया संघाच्या श्रध्दा सारडा (1-2) आणि सुनिता मुंदडा (1-9) किफायतशीर गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.