कायद्याचा सल्ला

मी साधारणपणे 10 वर्षांपूर्वी रविवार पेठ या ठिकाणी एक मिळकत विकत घेतली आहे. या मिळकतीच्या तळमजल्यावर एक दुकानदार असून तो मला नियमित भाडे देत नाही. त्याचप्रमाणे या दुकानदाराने माझ्या लेखी परवानगीशिवाय दुकानामध्ये फेरबदल केले आहेत. सदर दुकानदार हा आर्थिकदृष्ट्या सधन आहे. माझ्या मुलाला ही दुकानाची जागा ऑफिससाठी हवी आहे तर मला या दुकानाच्या ताब्यासाठी काय करावे लागेल?
उत्तर : तुम्ही या दुकानदाराविरुद्ध लघुवाद न्यायालयामध्ये दावा करून मुंबई भाडे नियंत्रण कायद्याप्रमाणे तुमची जागा तुम्हाला गरजेची आहे व दुकानदाराने दुकानात फेरबदल केले आहेत. या कारणास्तव रितसर दावा करून तुमचे दुकानाचा ताबा मे. कोर्टाकडून मिळवू शकतात.

मी विवाहित असून मला 2 अपत्ये आहेत. सुमारे 3 वर्षांपूर्वी माझ्या पत्नीबरोबर कायदेशीर घटस्फोट झाला आहे व माझी मुले माझे घटस्फोटीत पत्नीकडे आहेत. माझे मुलीचे नुकतेच लग्न झाले आहे. परंतु माझी पत्नी माझे 8 वर्षांच्या मुलाचे संगोपन व्यवस्थित करीत नाही व त्याचे खाण्यापिण्याचे कपड्यालत्याचे व शिक्षणाचे हाल करत आहे. याबाबत माझा मुलगा मला वेळोवेळी भ्रमणध्वनी करून कळवत आहे व तो माझ्याकडे राहण्यास येऊ इच्छित आहे. तर मला मुलांचा ताबा मिळवता येईल का?
उत्तर : अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचे मुलांचा ताबा कोर्टाकडे अर्ज करून मिळवता येईल. त्यासाठी तुम्हाला कायद्याअन्वये अर्ज करून वस्तुस्थिती कोर्टासमोर आणावी लागेल व त्यासाठी योग्य ते पुरावे मे. कोर्टामध्ये द्यावे लागतील. या अर्जाचे कामी न्यायालय तुमचे मुलांची जबानी घेऊन तुम्हास तुमचे मुलांचा ताबा देऊ शकेल.

माझे बिबवेवाडी या ठिकाणी एक स्वकष्टार्जित सदनिका आहे व सध्या ती मी 11 महिन्याचे कराराने दिली आहे. माझे कुटुंबामध्ये मला पत्नी व एक विवाहित मुलगा व एक विवाहित मुलगी आहे. मला माझे मृत्यूपश्‍चात सदर सदनिका फक्त माझे पत्नीचे मालकी वहिवाटीस द्यावयाची असेल तर त्यासाठी काय करावे लागेल?
उत्तर : तुमची सदनिका ही स्वकष्टार्जित असल्याने ती तुमच्या मर्जीने तुम्ही तुमचे हयातीत अथवा त्यानंतरही कुणाला देऊ शकता. तुम्ही या सदनिकेबाबत व इतर इस्टेटीबबात रितसर इच्छापत्र (वुईल) करू शकता. हे इच्छापत्र करताना तुम्हास ते साध्या कागदावर करता येईल. मात्र त्यांच्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या आवश्‍यक आहेत व तुमचे डॉक्‍टराकडून तुम्ही हे इच्छापत्र करण्यास शारिरीक व मानसिकरित्या सक्षम आहात असा दाखला घेणे आवश्‍यक आहे. तुमची इच्छा असल्यास सदर इच्छापत्र तुम्ही नोटरीकडे अथवा सब रजिस्टार यांचे कार्यालयात नोंदवू शकतात.

माझा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. मी माझे ओळखीचे महिलेस तिच्या आर्थिक अडचणीसाठी रक्कम रु. 3,50,000/- दिले होते. सदर रक्कम परतफेडीपोटी तिने मला रक्कम रुपये 3,50,000/- चा धनादेश दिला होता. सदर धनादेश नुकताच पुरेशी शिल्लक नाही. या कारणास्तव परत आला आहे. सदर मी दिलेल्या रकमेच्या वसुलीसाठी मला काय करावे लागेल?
उत्तर : आपण भरलेला धनादेश परत आल्यानंतर 1 महिन्याचे आतमध्ये आपण परक्राम्य लेख अधिनियम (निगोशिएबल इन्स्ट्रयुमेंट ऍक्‍ट) कलम 138 प्रमाणे धनादेश देणाऱ्या व्यक्तीस नोटीस पाठवावी व त्यामध्ये नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांचे आतमध्ये धनादेशची रक्कम मागावी. जर नोटीस मिळूनदेखील आपणास धनादेश देणाऱ्या व्यक्तीने रक्कम दिली नाही तर नोटीस पोहचल्यापासून दीड महिन्याचे आतमध्ये तुम्हास ज्या व्यक्तीविरुद्ध खासगी फौजदारी फिर्याद जे.एम.एफ.सी. कोर्टामध्ये दाखल करावे लागेल. सदर धनादेश न वटविण्याचा हा प्रकार हा एनआय ऍक्‍ट कलम 138 प्रमाणे गुन्हाच असून त्याला कायद्याप्रमाणे धनादश रकमेच्या दुप्पट रक्कम इतका दंड व 2 वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. नवीन झालेल्या या एन.आय. ऍक्‍टमधील दुरूस्तीप्रमाणे आपणास धनादेशाच्या रकमेपैकी 20% रक्कम केस दाखल केल्यावर मागण्याचा अधिकार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)