कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाचीही चर्चा
मुंबई: कॉंग्रेस गटनेता आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटीला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन विरोधी पक्षनेता निवडीला आता वेग आला आहे. कॉंग्रेस गटनेता आणि विरोधी पक्षनेते निवडीसाठी कॉंग्रेस आमदारांची बैठक आयोजीत करण्यात आली आहे. ही बैठक पार कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत पडणार आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी आता विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचे नाव चर्चेत आहे. लोकसभा निकालानंतर राज्यात कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाचीही चर्चा आहे. या पदासाठीही बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे वडेट्टीवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातच विरोधी पक्षनेतेपदासाठी स्पर्धा असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, नगरमध्ये मुलगा सुजय विखे-पाटील यांना कॉंग्रेसचे तिकीट मिळावे यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आग्रही होते. पण आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने सुजय यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर मग सुजय विखे यांनी बंड पुकारात थेट भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळविली.
सुजय विखेंनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी वडील राधाकृष्ण विखेंनी मात्र फक्त विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत कॉंग्रेसमध्येच राहणे पसंत केले आहे. पण कॉंग्रेसमध्ये राहूनही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात मात्र त्यांनी नगर आणि शेजारील शिर्डी मतदारसंघातही युतीच्या बाजूनेच आपली ताकद उभी केली. विखेंच्या या भूमिकेमुळे आता कॉंग्रेसनेही बाळासाहेब थोरातांना ताकद देण्याच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिर्डीतील सभेतनंतर थोरातांकडे केलेल्या मुक्कामाचीही जोरदार चर्चा झाली.