नेवाशात रस्ता कामांच्या तक्रारींना केराची टोपली

आ. मुरकुटेंनी पाठपुरावा करून उपलब्ध केला कोट्यवधींचा निधी : बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बघ्याची भूमिका

नेवासे: वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या रस्त्यांची कामे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पाठपुरावा करून कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून मार्गी लावली. परंतू या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आता गावा-गावातून शंका व्यक्‍त होवू लागली आहे. आमदारांनी रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून कामांचा शुभारंभ केला. आता जबाबदारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह काम करणाऱ्या ठेकेदारांची आहे. मात्र ही कामे दर्जेदार होत नसल्याने अनेक गावांमधील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्‍त करून संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत, पण अधिकाऱ्यांनी या तक्रारींना केराची टोपली दाखविल्याने अधिकारी व ठेकेदारांची मैत्री चव्हाट्यावर आली आहे.

नेवासे तालुक्‍यात आ. मुरकुटे यांनी अनेक प्रमुख रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध करू दिला. त्यासाठी त्यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा देखील केला. त्यामुळे आज नेवासे तालुक्‍यात कोट्यवधींच्या रस्त्यांची कामे सुरू झाली आहे. ही कामे मंजूर झाल्यानंतर संबंधित गावांनी आमदारांच्या कामांचे कौतूक केले. परंतू आता निष्कृष्ट दर्जाचे होत असलेल्या कामांमुळे आमदारांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आ. मुरकुटे यांनी माका – देडगाव – कुकाणा – तरवडी – गेवराई – शिरसगाव या 30 किलोमीटर रस्त्यासाठी 60 कोटी, पिंप्री – शहाली – पाथरवाला – अंतरवली – चिलेखनवाडी – देवसडे – तेलकूडगाव – पाचुंदे या 14 किलोमीटर रस्त्यासाठी 4 कोटी, करजगाव – इमामपूर – गोनेगाव या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी 5 कोटी 30 लाख, चांदा – महालक्ष्मी – हिवरे – माका या 13 किलोमीटर रस्त्यासाठी 1 कोटी 13 लाख, चांदा – शिंगवेतुकाई – लोहारवाडी – मोरेगव्हाण हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून घेण्यात आला असून त्यासाठी 3 कोटी 52 लाख, देवसडे – जेऊर – देवगाव या मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्यासाठी 3 कोटी 43 लाख, बेलपिंपळगाव ते घोगरगाव रस्ता या मुख्यमंत्री सडक योजनेच्या 6 किलोमीटर रस्त्यासाठी 3 कोटी रुपये असा निधी उपलब्ध करून या कामांचा शुभारंभ करून कामांना सुरूवात देखील केली आहे. तालुक्‍यात एवढ्या मोठ्या प्रमाणवर निधी मिळून प्रलंबित रस्त्यांची कामे होत आहे. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारांचे फावले आहे.

तालुक्‍यात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांना निकृष्ट दर्जाची साडेसाती लागली असून नागरिकांच्या तक्रारीकडे अधिकारी मात्र सोयस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचा नागरिक वैतागले आहेत.या रस्त्याच्या दर्जाच्या तक्रारीसाठी अनेक संघटनेच्या अध्यक्षांनी, गावचे सरपंच तसेच प्रतिष्ठीत व्यक्तीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरसाळे, उपअभियंता खामकर, शेळके यांना फोन व समक्ष भेटून तक्रारी अर्ज दिले. मात्र त्यांनी लेखी अर्जांना केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे अनेकांनी नाशिकच्या गुणनियंत्रण शाखेकडे धाव घेतली असून लवकरच या सर्व रस्त्याचे मुल्यांकन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)