पुणे: घरफोडी करत 42 हजार रुपयांचा ऐवज लांबविणाऱ्या दोन बांग्लादेशी नागरिकांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 1 महिना कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
रिदानुर रहेमान राकिब (वय 62) आणि जाकीर कोबिद हुसेन (वय 42, दोघेही, रा. संतोषनगर, कात्रज, मूळ. बांग्लादेश) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याबाबत निखिल राजेंद्र चन्नापटन (वय 27, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.45 ते 12 नोव्हेंबर 2017 रोजी सायंकाळी 6.30 या दरम्यानच्या कालावधीत फिर्यादींच्या घरामध्ये घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये पोलीस निरीक्षक सतीश निकम यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
न्यायालयीन कामकाजासाठी सहकारनगर पोलीस स्टेशनच्या गिरीश चव्हाण यांनी मदत केली. फिर्यादींच्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करून रोख 17 हजार रुपये, सोन्याचे दागिने लांबविण्यात आले होते. हा मुद्देमाल पोलिसांनी त्यांचाकडून जत्प केला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपापत्र दाखल केले.