अमेरिकेकडून नव्याने निर्बंध लादले गेल्याचा परिणाम
तेहरान – अमेरिकेसह अन्य 5 देशांबरोबर 2015 साली केलेल्या अणू करारामधून आज इराणनेही माघार घेतली. अमेरिकेने या करारातून यापूर्वीच माघार घेतली आहे. अमेरिकेकडून इराणवर नवीन निर्बंध लागू केले जाण्याच्या पार्श्वभुमीवर इराणने हे पाऊल उचलले आहे. या निर्बंधांपासून वेगळी वाट शोधली जात नाही, तोपर्यंत 2015 च्या अणू कराराचे पालन करणे आपल्यावर बंधनकारक असणार नाही, असे इराणने म्हटले आहे. अमेरिकेने कालच इराणविरोधातील लष्करी कारवाईसाठी आपली युद्धसामुग्री, लढाऊ विमाने, विमानवाहू तोफा मध्यपूर्वेच्या दिशेने रवान केल्या आहेत. अमेरिकेच्या या हालचाली संभाव्य युद्धाची लक्षणे दाखवत असल्याने इराणने या अणू कराराच्या अंमलबजावणीचे बंधन झुगारून दिले आहे.
कराराची बांधिलकी जपण्याचे रशियाचे आवाहन
इराणबरोबरच्या अणू करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या देशांनी या अणू कराराची बांधिलकी जपावी, असे आवहन रशियचे विदेश मंत्री सर्जी लावरोव यांनी केले आहे. इराणचे विदेश मंत्री मोहम्मद जावेद झारिफ यांच्याबरोबरच्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी वस्तुनिष्ठ निर्णय घेणे गरजेचे आहे. या करारातील सहभागी सर्व देशांनी आपली बांधिलकी जपली पाहिजे. 2015 साली केलेला करार अमेरिकेने माघार घेतल्यापासून नाजूक बनला आहे. युरोपातील प्रमुख देशांनी केलेल्या संयुक्त सर्वसमावेशक कृती आराखड्यानुसार केलेल्या करापासून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या करारावरील स्वाक्षरी केलेले देश आता करत आहेत. अशा शब्दात लावरोव यांनी अप्रत्यक्षरितीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली.
आपल्यावरील निर्बंध एकतर्फी आहेत. वर्षभरापूर्वी अणू करारातून बाहेर पडल्यावर अमेरिकेने हे निर्बंध नव्याने लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थकारणाला मोठा फटका बसला आहे. पूर्वी मान्य केलेल्या या करारातील काही तरतूदींची अंमलबजावणी आपण थांबवत असल्याचे इराणने म्हटले आहे. जर या करारातील भागीदार असलेले अन्य देश अणू करारातून बाहेर पडल्यास या करारातील उर्वरित तरतूदींमधूनही माघार घेतली जाईल, असे इराणने म्हटले आहे. अमेरिकेसह ब्रिटन, फ्रान्स, चीन, जर्मनी आणि रशियाबरोबर इराणने 2015 साली अणू करार केला आहे.