दौंड येथे होणार स्वतंत्र प्रांत कार्यालय

आमदार राहुल कुल यांची माहिती
काही दिवसांत शासन निर्णय होणे अपेक्षित
यवत – राज्यातील पाहिले स्वतंत्र प्रांत कार्यालय दौंड येथे होणार असून या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्कामोर्तब केले आहे. काही दिवसात याबाबत शासन निर्णय होणे अपेक्षित आहे, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.

भांडगाव (ता. दौंड) आमदार कुल यांच्या हस्ते विकास कामांचे उद्‌घाटन व लोकार्पण सोहळा झाला. यावेळी कुल बोलत होते. ते म्हणाले की, मागील पंचवार्षिक वेळी दौंड येथे प्रांत कार्यालय व्हावे, अशी त्यावेळच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या असणाऱ्या सरकारकडे मागणी केली होती. मात्र, विरोधकांनी प्रांत कार्यालय पुणे येथे व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार हे कार्यालय पुणे येथे मंजूरही झाले.

मात्र, आम्ही या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देत प्रांत कार्यालय भौगोलिक परिस्थिती पाहून दौंड किंवा पुरंदर येथे घेण्याचा निर्णय दिला. मात्र, दौंड येथे प्रांत कार्यालय झाल्यास याचे श्रेय मला मिळेल, यासाठी विरोधकांनी दौंड ऐवजी पुरंदरमध्ये हे कार्यालय घेतले. पुरंदर येथे असलेले प्रांत कार्यालय दौंडकर जनतेच्या सोयीचे नसल्याने दौंडला स्वतंत्र प्रांत कार्यालय व्हावे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
आमदार कुल म्हणाले की, मुळशी धरणाचे पाणी या भागाला मिळाले नाही तर पुढील काळात भयावह स्थिती निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही.

त्यासाठी या भागाला मुळशी धरणाचे पाणी मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मुळशीचे पाणी या भागाला आल्यास पुढील शंभर वर्षांचे पाण्याचे नियोजन होऊन अर्थव्यवस्था सुधारेल. यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, उद्योजक लक्ष्मण काटकर, माऊली ताकवणे, धनाजी शेळके, भांडगावच्या सरपंच कमल टेळे, उपसरपंच शीतल दोरगे, रविंद्र दोरगे, लक्ष्मण दोरगे, माजी सरपंच बाबासाहेब दोरगे, रोहीदास दोरगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब दोरगे, दादासाहेब टेळे, विजय दोरगे, ग्रामसेवक निलेश लोंढे आदी उपस्थित होते. प्रस्ताविक लक्ष्मण दोरगे यांनी केले तर श्‍याम कापरे यांनी आभार मानले.

एमआयडीसीसाठी प्रयत्नशील…

खोर, भांडगाव व देऊळगावगाडा या भागात प्रदूषणविरहीत औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) निर्माण व्हावी यासाठी पाठपुरावा करीत आहे. परंतु, भूसंपादन कायद्यामुळे यात अडचणी येत आहेत तरी याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल. या भागात औद्योगिक वसाहत आल्यानंतर त्यामध्ये येणारे उद्योग देखील स्थानिक तरुणांना व परिसरातील नागरिक यांना फायदेशीर असतील, असेही आमदार कुल यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)