2 हजार सफाई कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

3 महिन्यांपासून मिळेना वेतन : तातडीने वेतन अदा करण्याची कामगार युनियनची मागणी

पुणे – महापालिकेच्या 7 क्षेत्रीय कार्यालयांकडील सुमारे 1835 सफाई कर्मचाऱ्यांना मे महिन्यापासून वेतनच मिळाले नसल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. या सफाई कामगारांसाठी असलेली निविदा 31 मार्च रोजी संपल्यानंतर नवीन निविदा अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. असे असतानाच, जुन्या ठेकेदारांना मुदतवाढ देऊन महापालिकेकडून शहर स्वच्छतेचे काम करून घेण्यात येत आहे. मात्र, या ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांचे वेतनच देण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हे वेतन अदा करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणे महापालिका कामगार युनियनने दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेकडून शहराचे स्वच्छतेचे रॅंकिंग वाढविण्यासाटी मोठ्या प्रमाणात शहर स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिका हद्दीतील पडीक झाडण हद्दी आणि दैनंदिन स्वच्छतेसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या 15 मधील येरवडा क्षेत्रिय कार्यालयाकडे 270 कामगार कंत्राटी पद्धतीने सफाईचे कामे करत आहेत. सदर कामगारांचे माहे एप्रिल, मे, जून, जुलै असे एकूण 4 महिन्यांचे वेतन अदा केले नाही. तसेच, शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे 125 कामगार व औंध क्षेत्रिय कार्यालयाकडे 310 कामगार, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे 310 कामगार असे एकूण 745 कंत्राटी कामगार सफाईचे कामे करतात. सदर कामगारांचे मे, जून 2019 या दोन महिन्यांचे वेतन अदा केले नाही.

याशिवाय, कोंढवा, वानवडी क्षेत्रिय कार्यालय 225, नगररोड क्षेत्रिय कार्यालय 330, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय 265 असे एकूण 820 कंत्राटी पद्धतीने कामे करणाऱ्या कामगारांचे एप्रिल, मे, जून 2019 असे तीन महिन्यांचे वेतन अदा केले नाही. महानगरपालिकेच्या सात क्षेत्रिय कार्यालयांकडे एकूण 1835, सफाई कामगार वेतनाविना कामे करत आहेत. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

उपासमार करून शहर स्वच्छता नको

महापालिका “स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन’ पुणे शहराला एकनंबर मानांकन मिळविण्यासाठी कंत्राटी कामगारांना उपाशीपोटी राबवून घेतले जात आहे. माणूसकी शून्य प्रशासन व ठेकेदार यांच्या संगनमताने कंत्राटी कामगार भरडला जात असल्याची टीका पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली आहे. तसेच 8 दिवसांच्या आत कंत्राटी कामगारांचे वेतन न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट व युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्‍ता मनोहर, युनियनचे कार्याध्यक्ष कॉ. चंद्रकांत गमरे, संयुक्‍त चिटणीस कॉ. मधुकर नरसिंगे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)