चंद्रपुरात सर्वोच्च तापमानाची नोंद

विदर्भात उन्हाचा कहर सुरुच पुढील काही दिवस तापमान चढेच राहण्याचा अंदाज

चंद्रपूर- राज्यासह विदर्भात काही दिवसांपासून उन्हाचा कहर सुरुच आहे. नागपुरात गेल्या 15 वर्षातील दुसरे सर्वोच्च तापमान (47.5) आहे, तर चंद्रपूरचे तापमान 47.8 डिग्री सेल्सियस एवढे नोंदले गेले आहे. यंदाच्या मोसमातील चंद्रपूरमधील हे सर्वोच्च तापमान आहे. गेले काही दिवस चंद्रपूरचा पारा 46 डिग्री सेल्सिअसच्या आसपास होता. आज त्याने उसळी घेत नव्या उच्चांकाची नोंद केली. पुढचे काही दिवस तापमान चढेच राहण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार आज पाऱ्याने नवा उच्चांक गाठत यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद केली. निर्मनुष्य झालेले रस्ते, एसी वा कुलरच्या गारव्यानेही थंडावा मिळत नसल्याचे चित्र आणि स्वतःला थंड ठेवण्यासाठी नागरिकांनी विविध शीतपेयांचा घेतलेला आधार अशी सध्या चंद्रपूरकरांची स्थिती आहे. गेले काही दिवस चंद्रपूरचे तापमान 46 डिग्री सेल्सिअसच्यावर नोंदले गेले आहे. आजचे तापमान 47.8 डिग्री सेल्सिअस एवढे नोंदले गेले असून यामुळे नागरिक मात्र हैराण झाले आहेत.

चंद्रपूरच्या तापमानाने 49 डिग्री सेल्सियस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद 2 जून 2007 रोजी केली होती. हे गेल्या काही दशकातील सर्वाधिक तापमान होते. सध्या पुढचे काही दिवस चंद्रपूरकरांना उष्णतेच्या लाटेपासून मुक्तता नसल्याचे अभ्यासकांचे मत आहे. उष्णतेची ही लाट मान्सून रखडल्यास अधिक काळापर्यंत राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. केवळ चंद्रपूरच नव्हे तर विदर्भाच्या काही जिल्ह्यात अशाच प्रकारच्या उष्णतेच्या लाटांमुळे कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)