संसार हा सुखाचा

ऊनसावली, सुखदु:ख, चढउतार हे जीवनाचे अविभाज्य भाग असतात. ते येतात-जातात. कायम काहीही राहत नाही. पण त्या त्या काळात, त्या वेळी आपल्या पाठीशी कोणी असणं, आपल्याला कोणाची तरी साथ असणं हे फार महत्त्वाचं असत. या साथीनं सुखं द्विगुणित होतात आणि दु:खं, अडचणी कमी होत जातात. मात्र अशा सुखदु:खाच्या प्रसंगी साथ देणारे मिळतातच असे नाही. अनेकदा अपेक्षाभंगच जास्त होतात. मात्र अशा प्रसंगी साथ देण्यासाठी आपल्या जन्माच्या सहकाऱ्याइतकं, आपल्या जोडीदाराइतकं जवळचं कोण बरे असू शकेल? आपल्या साथीदाराचा हात हाती असणं, तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं फार फार महत्त्वाचं असतं. छोटे-मोठे खटके हे प्रत्येक जोडप्यामध्ये उडत असतात. पण हे खटके, वाद, भांडणं ही अळवावरच्या थेंबासारखी असतात. टिकून रहत नाहीत. कधी गेली हे देखील कळत नाही. पूर्वी विवाहबंधन म्हणजे एक पवित्र बंधन अशी भावना होती. ही साता जन्माची सोबत समजली जायची. नुसती समजली जायची असे नाही, तर तसा ठाम विश्‍वास असायचा.

कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना समजून घेत, सावरत पुढे जाण्यात सुखी आयुष्याचं गमक असतं. आजकाल पाहिले तर अगदी नवविवाहित जोडपीही अगदी अटीतटीने भांडतात. अगदी क्षुल्लक गोष्टीवरून. आणि कोणीही पडते घ्यायला तयार नसते. त्यांची समजूत घालणारेही घरात कोणी मोठे माणूस नसते. हम दो च्या जमान्यात कधी घटस्फोटापर्यंत वा नुसतेच विभक्त राहण्यापर्यंत मजल जाईल हे सांगता येत नाही. आपल्या जोडीदारासोबत एकोप्याने राहण्यासाठी, तुमच्यातील संबंध आणखीन घट्ट होण्यासाठी काही सोप्या सोप्या टिप्स…

कदाचित तुम्हा दोघांचे सूर जुळायला वेळ लागेल. त्यासाठी तुम्ही एकमेकांचे विचार एकमेकांसोबत शेअर करा. तुम्हाला खटकणाऱ्या क्षुल्लक गोष्टींपासून तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्येपर्यंत.

तुमच्या मनात एखादी गोष्ट सलत असेल तर त्याबाबत तुमच्या जोडीदाराशी बोला. अनेकदा आपल्याला सलत असलेल्या गोष्टींचे मूळ वेगळेच असते. गैरसमज, अपसमज असू शकतात. ते शोधून दूर करण्याचा प्रयत्न करा.

तुम्हा दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते. तुमची मते वेगळी वेगळी, कधी विरोधीही असू शकतात. पण तुम्ही दोघंही कोणत्या वेगळ्या ध्रुवावरुन आलेला नाहीत हे लक्षात ठेवा. वेळ प्रसंगी एकमेकांना समजून घेऊन पुढे मार्गक्रमण करा.

प्रत्येक नवीन दिवस नवीन संधी घेऊन येतो. त्या संधीचा तुमचं नातं अधिक सुदृढ करण्यासाठी उपयोग करा. एकमेकांच्या विचारांचा आदर करा.

राग आंधळा असतो, हे लक्षात असूद्या. रागाच्या भरात बोललेले शब्द, केलेली कृती हानिकारक, अनर्थकारक होऊ शकते याचे स्मरण करा. तेव्हा थोडे शांतपणे घ्यायची सवय असावी. पूर्वी राग आला की दहा अंक मोजावे असे म्हणायचे. त्यामागे हाच हेतू होता. अंक मोजेपर्यंत बराच राग शमून जातो हा त्यामागचा हेतू. तुम्हा दोघांच्या नात्यामध्ये रागाला थारा देऊ नका.

प्रत्येक गोष्टीत वाद घालण्यापेक्षा शांतपणे चर्चा करा.

तुम्ही दोघे नवरा-बायको आहातच. पण आधी तुम्ही एकमेकांचे मित्र आहात हे लक्षात ठेवा.

कोणीही तुमच्या आयुष्यात आयता आनंद घेऊन येणार नाही. तुमचा आनंद कशात आहे, हे तुम्हालाच शोधावं लागतं.

त्यामुळे एकमेकांच्या सहवासात आनंदी राहा. तेव्हा समजूनउमजून गुण्यागोविंद्याने राहा. सुखाचा संसार करा.

– विद्या शिगवण

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)