पुणे – जप्तीच्या मालवर अतिक्रमण विभागाचा ‘डल्ला’

हातगाड्या विक्रीचे महापालिकेत रॅकेट


मालकांवर पालिकेचे उंबरे झिजविण्याची वेळ

पुणे – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरात करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईनंतर जप्त केलेल्या हातगाड्या तसेच माल बालेवाडी येथील गोदामात ठेवला जात आहे. मात्र, या ठिकाणचा माल परस्परच विकण्याचे नवीन रॅकेट तयार होत असल्याचे समोर आले आहे. कारवाईनंतर काही जप्त केलेल्या हातगाड्या परस्परच काळा बाजारात विकण्यात आल्या असल्याने, अनेक हातगाडी मालकांवर महापालिकेचे उंबरे झिजविण्याची वेळ आली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यात आले असून जागांनुसार, श्रेणी निश्‍चित करण्यात आलेल्या आहेत. या श्रेणीत या व्यावसायिकांना जागा निश्‍चित करून देण्यात आलेली आहे. या जागे व्यतिरिक्त व्यावसायिकांनी इतरत्र विक्री करताना आढळून आले असल्यास अशा व्यावसायिकांचे साहित्य तसेच पथारी महापालिकेकडून जप्त करण्यात येते. अशाच प्रकारची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने फेब्रुवारी महिन्यात निलायम चित्रपटगृहाच्या परिसरात केली होती. यावेळी एका “अ’ श्रेणीतील व्यावसायिकाची हातगाडी जप्त करण्यात आली. त्यानंतर या व्यावसायिकाला दंड भरून आपली हातगाडी तसेच इतर साहित्य घेऊन जाण्यास सांगण्यात आले. तसेच, हे साहित्य लगेच मिळणार नाही. महिन्याभराने ते घेऊन जावे, असेही सांगण्यात आले. त्यामुळे या व्यावसायिकाने 20 दिवसांनंतर पैसे जमा करून अतिक्रमनाचा दंड भरला तसेच साहित्य सोडविण्यासाठीची पावतीही क्षेत्रीय कार्यालयात जाऊन केली. त्यानंतर साहित्य घेऊन जाण्यासाठी या व्यावसायिकाला बालेवाडी येथील गोदामात जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे हातगाडी आणण्यासाठी टेम्पो घेऊन हा व्यावसायिक गोदामात गेला असता, त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांकडून “तुमची गाडी आमच्याकडे आलीच नाही’ असे सांगण्यात आले. त्यामुळे त्याने पुन्हा अतिक्रमण विभाग गाठला असता गाडीची नोंद बालेवाडीला पाठविण्यात आल्याची होती. त्यानंतर या अधिकाऱ्याने थेट अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. तसेच, हा प्रकार सांगण्यात आला. मात्र, त्यानंतर या अधिकाऱ्याने संबंधित कर्मचाऱ्यांना हातगाडी देण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्यावेळी ही गाडीच गायब असल्याचे समोर आले तर ही बाब वरिष्ठांपर्यंत गेल्याने घाबरलेल्या गोदामातील कर्मचाऱ्यांनी “तुमची गाडी चोरीला गेली’ असल्याचे सांगत, “तुम्हाला कारवाईत उचलून आणण्यात आलेली दुसरी गाडी देतो, तक्रार करू नका’ असे समजाविण्यात आले. मात्र, त्यानंतर आता दोन अडीच महिने होत आले तरी, या व्यावसायिकाला हातगाडी दिली जात नसून वेळोवेळी कारणे दाखवून हुसकावून लावले जात आहे.

अतिक्रमण विभागाचे हात वर
या प्रकारामुळे संतापलेल्या या व्यावसायिकाने स्थानिक नगरसेवकाच्या मध्यस्थीतून अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र, यावेळी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या साहित्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे, असे सांगत यांचीही गाडी चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. तसेच अतिक्रमण विभागाची जबाबदारी केवळ कारवाईची असून गोदामातील साहित्याच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा विभागाची असल्याचे सांगत हात वर करण्यात आले आहेत.

चोरीचा धंदा जोमात
अशा प्रकारे साहित्य चोरीच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी रोज अतिक्रमण विभागाकडे येत आहेत. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवणे शक्‍य नसल्याचे सांगत या विभागाकडून हात झटकले जात आहेत. अतिक्रमण कारवाईत जप्त करून आणलेल्या या हातगाड्या तयार केलेल्या तसेच गरजेनुसार, प्रत्येक व्यवसायासाठी मॉडीफाय केल्या असल्याने त्या काही ठराविक फॅब्रिकेशन विक्रेत्यांना चिरीमीरी घेऊन विकल्या जातात. नंतर हेच विक्रेते पुन्हा या गाड्या मोठी किंमत आकारून व्यावसायिकांना देत आहेत. त्यामुळे चोरीचा धंदा जोमात असताना अतिक्रमण विभागाकडून काहीच केले जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)