अभिवादन – समृद्ध पर्यावरण : शिवरायांची नीती

-विठ्‌ठल वळसेपाटील

350 वर्षांपूर्वी अखंड हिंदुस्थानावर मोगल सत्ता थैमान घालत असताना सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या एका राजाने रयतेचं राज्य उभे केलं. रयतेच्या सुखदुःखाचा विचार केला गेला. कोणत्याही प्रकारे जनतेवर राज्य निर्मितीसाठी बळाचा वापर झाला नाही. हीच ओळख जगाला दाखवून दिली. आरमार उभे करताना जनतेचा व पर्यावरणाचा किती संगम उभा केला आहे ते शिवचरित्रात दिसते. आदर्शवत्‌ राज्य म्हणून छत्रपती शिवरायांच्या राज्यव्यवस्थेचा जगभर अभ्यास केला जातो. देशात या राजाचा जन्मसोहळा “सण’ म्हणून साजरा केला जातो.

शिवरायांची राजनीती, न्यायनिवाडा, तह, परराष्ट्र धोरण, आरमार, युद्धनीतीविषयीची आज्ञापत्रे किती मोलाची आहेत हे अभ्यासल्यावर कळते. आज्ञापत्रे साक्षात चरित्राचे दर्शन घडविणारा आरसा आहे. योग्य त्या ठिकाणी नम्रता, कधी अधिकारवाणी तर कधी सक्‍ती दिसते. रयतेची काळजी करणारी ही पत्रे एक अमूल्य ठेवा आहे.

सध्या देशातील पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्राचा अभ्यास केला गेला पाहिजे. शिवजयंती उत्सव आत्मसात करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यातील एक पैलू आरमारविषयक आज्ञापत्रातून रयतेची काळजी करणारा दिसतो.

उत्तम प्रकारे आरमार उभे करताना कोणत्याही शेतकऱ्याच्या मालाला धक्‍का लागत नाही ही खरी लोकशाही आहे. ब्रिटिश राजवटी अगोदर जंगले समृद्ध होती, वनात विविध प्रकारची वनऔषधी, इमारतीसाठी व सैन्यदलासाठी लागणारे वृक्ष होते. ब्रिटिश राजवटीत समृद्ध जंगले नष्ट झाली. त्याठिकाणी शोभेची व विदेशी झाडे आली. शिकारीच्या हौसेने अनेक प्राणी नष्ट झाले.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही जंगले समृद्ध झाली नाहीत, उलट डोंगर, दऱ्या नष्ट होऊन उद्योगधंदे विकसित झाले. त्यांनी आपल्या सोयीप्रमाणे जंगलतोड केली आणि जंगलातील प्राणीही भुकेने नष्ट झाले. या जंगलांसाठी शिवरायांची नीती वापरली असती, तर आज पावसाचा व भूजल पातळीचा प्रश्‍न उभा राहिला नसता; पण हे लक्षात कोण घेतो? आज जंगले उजाड झाली आहेत. छत्रपती शिवरायांनी व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या युरोपियनांचा धोका ओळखला होता.

आक्रमणे, भविष्यातील सुरक्षितता लक्षात घेत सागरी महत्त्व वाढीस लागण्यास उत्तम आरमार उभे केले पाहिजे, त्यांच्या आज्ञापत्रात दूरदृष्टीने आरमार उभे केल्याचे दिसते. जंगलांचे रक्षण करण्याचा दंडकही स्वराज्य रक्षक कान्होजी आंग्रेंनी अंमलात आणलेला दिसतो. शिवकाळात जंगलतोड बंदी असल्याने रयत सुखी दिसते. कारण भूजलव्यवस्था उत्तम प्रकारे दिसते. आज शेतकरी मात्र संकटग्रस्त झालाय. महाराजांच्या आज्ञापत्रांत त्यांनी त्यावेळी सावकारी करणारे टोपीकर व त्यांचे मालक यांच्यापासूनच स्वराज्याचा धोका ओळखला होता. म्हणून आरमाराची चांगली उभारणी केली. हे करत असताना रयत दुःखी होता कामा नये याची दक्षता घेतली. त्यामुळे सर्वतोपरी स्वराज्य रक्षणाची काळजी करणारीही रयत होती.

शिवरायांच्या दूरदृष्टीतून 350 वर्षांपूर्वी वने किती समृद्ध होती ते या आज्ञापत्रामधून दर्शन घडते. शिवरायांच्या प्रत्येक व्यवस्थेत रयत केंद्रस्थानी दिसते. आज मात्र देशातील लोकशाही व्यवस्थेत एकमेकांचे वाभाडे काढण्यात धन्यता मानणारी मंडळी आहे. त्यांना इतिहासाचा विसर पडला असून राजसत्ता सुंदरीच्या मोहात पडले आहेत. त्यांना जागे करण्यासाठी शिवचरित्राची गरज आहे. विशेषतः पर्यावरण प्रेमी मंडळींना आरमाराच्या आज्ञापत्रातून शिकून प्रत्येकाने प्रति वर्षी एक एक देशी वृक्ष लावावा. त्यानंतरच खऱ्या अर्थाने छत्रपतींचा आम्ही पाईक आहोत असे म्हणण्याला अर्थ प्राप्त होईल.

शिवरायांचे आज्ञापत्र

आरमारास तक्‍ते, सोंट, डोलाच्या काठ्या आदिकरून थोर
लाकूड असावी लागते, आपले राज्यांत अरण्यांत सागवानादि
वृक्ष आहेत त्यांचे जे अनुकूल पडेल
ते हुजूरचे परवानगीने तोडून
न्यावें. याविरहित जे लागेल ते
परमुलखींहून खरेदी करून आणवीत
जावें. स्वराज्यांतील आंबे, फणस आदि करून हेही लांकडें
आरमाराच्या प्रयोजनाचीं,
परंतु त्यांस हात लावूं देऊं नये. काय
म्हणोन, की, हीं झाडे वर्षां दोन वर्षांनी होतात असें नाही.
रयतांनी हीं झाडें लावून
लेंकरासारखी बहुत काळ जतन करून
वाढविलीं. ती झाडें तोडिल्यावर त्यांचे दु:खास पारावार
काय ? एकास दु:ख देऊन जे
कार्य करीन म्हणेल तें कार्य करणारा
सहित स्वल्पकाळाचें बुडोन नाहींसेच होते किंबहुना धनियाचे
पदरीं प्रजा पीडण्याचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावें
हानिही होते. याकरितां हे गोष्टी सर्वथैव होऊं न द्यावी.
कदाचित्‌ एखादें जें झाड बहुत
जीर्ण होऊन कामांतून गेलें असलें
तरी त्याचे धन्यास राजी करून
घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषें
तोडून न्यावें, बलात्कार सर्वथैव न करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)