बीजिंग : करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे मृत्यांच्या संख्येत पण भर पडत आहे. करोनामुळे चीनच्या हुबैई प्रांतात मंगळवारी 93 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 1800 वर गेली आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सोमवारी करोनाची लागण झालेली 1 हजार 807 नवी प्रकरणं समोर आली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.
दरम्यान, वुहान हे करोनाचे केंद्रबिंदू आहे. वुहान आणि हुबैई या प्रांतात करोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. इथे गेल्या महिन्याभरापासून लोक घरातच जायबंदी झाले आहे. करोनाच्या भीतीने लोक घराबाहेर पडेनासे झाले आहेत. करोनामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेवरही याचा गंभीर परिणाम जाणवू लागला आहे. चीनमध्ये ताज्या आकडेवारीनुसार 70 हजार 500 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी सुरु असलेल्या भरमसाठ उपाय योजनांबाबत जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. चीनबाहेर या आजाराचा प्रादुर्भाव अत्यल्प असून, सार्स किंवा मर्ससारख्या इतर कोरोना विषाणूजन्य आजारांच्या तुलनेत कोविड-19 हा आजार कमी घातक आहे, असे संघटनेनं म्हटले आहे. जपानप्रमाणे आणखी काही नव्या भागांमधे या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व जहाजवाहतूक थांबवण्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेने फेटाळून लावली आहे. विमान आणि जहाजवाहतूकीवर घातलेल्या निर्बंधांमुळे कोरोनाबाधित क्षेत्रात कारखानदारी आणि पर्यटन उद्योग रोडावला आहे.
करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू
चीनमध्ये झालेल्या करोनाचा संसर्गामुळे वुहान येथील एका रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱया एका डॉक्टरचा आज मृत्यू झाला आहे. करोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या वुचांग रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर ली झिमिंग यांचे करोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे.
मृत्यू झालेले डॉक्टर हे रुग्णालयाचे संचालक होते. करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना मृत्यू झालेले ली हे पहिलेच वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आहेत. मागील आठवडयात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू होते. दरम्यान, करोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत सहा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.