अग्रलेख : भेटीगाठींचे राजकारण

लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष भाग न घेताही सर्वांत जास्त चर्चेत राहिलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजधानी दिल्लीत कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा चर्चेत आले. या दोघांमध्ये निश्‍चित काय चर्चा झाली ते समोर येऊ शकले नसले तरी अंदाज लढवायला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या आठवड्यात पुन्हा एकदा राज ठाकरे यांची भेट घेतली आणि दोघांनी तासभर चर्चा केली. याआधीही मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर राजू शेट्टींनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे पुन्हा राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय चर्चांना उधाण आले नसते तरच नवल. राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या या भेटीगाठींमागील राजकारण काय आहे हे अद्याप उघड झाले नसले तरी चर्चेत राहण्याचा उद्देश मात्र सफल झाला आहे.

अनेक वर्षांनी दिल्लीत गेलेल्या राज ठाकरे यांनी इतर कोणत्याही राजकीय नेत्याची भेट न घेता सोनिया गांधी यांचीच भेट घेतली याला नक्‍कीच काही अर्थ आहे आणि लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विचार करायचा झाला तर या भेटीमध्ये युतीची चर्चा झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कारण तसे संकेत कॉंग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत कॉंग्रेस अनुकूल असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला आघाडीत घेण्यात पक्षात मतभिन्नता होती. पण, आता मतपरिवर्तन झाले आहे. गरज भासल्यास आणि आघाडीतील इतर घटक पक्षांचा आक्षेप नसल्यास कॉंग्रेस मनसेला आघाडीत घेण्यात सकारात्मक आहे, असे स्पष्ट शब्दांत चव्हाण यांनी सांगितले आहे.

दुसरीकडे राजू शेट्टीही याच एका हेतूने राज ठाकरे यांना भेटत असावेत अशी शंका घ्यायलाही जागा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असल्याने अशा हालचाली समजून घेण्यासारख्या असल्या तरी जलद निर्णय घेऊन युतीवर शिक्‍कामोर्तब करणे सर्व संबंधित पक्षांना शक्‍य होणार आहे का? याचा विचार करावा लागेल. मुळात राज्यात कॉंग्रेस आघाडीमध्ये अनेक पक्ष आहेत. राष्ट्रवादी हा प्रमुख पक्ष आहे, इतर अनेक छोटे मोठे पक्ष आहेत. प्रकाश आंबेडकर यांची आघाडीशी युती करण्याबाबत चर्चा सुरू आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागा असल्याने या जागांचे वाटप कसे करायचे हा सर्वांत मोठा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

राज ठाकरे यांच्या मनसेचा विचार करायचा झाला तर पक्ष स्थापनेनंतर पहिल्या निवडणुकीत त्यांनी 100 जागा लढवल्या होत्या आणि 13 जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच मनसेची किमान 100 जागा लढण्याची तयारी आहे; पण एवढ्या जागा मनसेला देण्याचा निर्णय होऊ शकत नाही हे वास्तव आहे. वाटाघाटी करून मनसेला 50 जागा लढवण्यासाठी मनवण्यात आले तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष आपल्या वाट्याच्या किती जागा मनसेला सोडू शकतात हा संशोधनाचा मुद्दा आहे. ग्रामीण भागात मनसेचा काहीच प्रभाव नसला तरी मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक या शहरी भागात मनसे प्रभावी आहे. त्या जागा आपल्याला द्याव्यात हाच राज यांचा आग्रह असू शकतो; पण तो आग्रह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांना मान्य होईल का? हा आणखी एक संशोधनाचा मुद्दा आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे राज यांच्या पक्षाची विचारधारा लपलेली नाही. मराठी अस्मितेची त्यांची भूमिका इतर घटक पक्षांना मान्य होईल का? याचाही विचार करावा लागेल. मुंबईत उत्तर भारतीय आणि बिहारी मतांवर राजकारण करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांना राज यांची ही भूमिका पटेल का? याचे उत्तर कृपाशंकर सिंह आणि संजय निरूपम यांनाच द्यावे लागेल. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष इतर घटक पक्षांचा मान राखत नाहीत, असा आक्षेप नेहमीच घेतला जातो. त्याचा विचार करता राजू शेट्टी आणि राज ठाकरे यांच्या भेटीतून राजकारणाचा नवीन कोन समोर येत आहे. आघाडी करण्याचा निर्णय वेळेत घेतला नाही तर आम्ही स्वबळावर सर्व 288 जागा लढवू हा राजू शेट्टी यांनी दिलेला इशारा म्हणूनच महत्त्वाचा आहे. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येऊन नवीन पर्याय निर्माण करू शकतात. ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी काम करणारे राजू शेट्टी आणि शहरी विषय हाताळणारे राज ठाकरे एकत्र आले तर एक नवीन समीकरण आकाराला येऊ शकते.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती तरी त्यांच्या सभांना गर्दी होत होती. त्यांचा पक्ष निश्‍चितच विधानसभा निवडणूक लढवणार आहे. सर्व जागा लढवण्याची त्यांची इच्छा आणि मानसिकता नाही. त्यामुळेच शेतकरी संघटनेसारख्या एखाद्या पक्षाशी युती करायला त्यांना आवडेल. भाजप-शिवसेना यांना पराभूत करणे हा हेतू बाळगणाऱ्या पण त्यासाठी कॉंग्रेस आघाडीची साथ मिळण्याची शक्‍यता नसलेले असे अनेक पक्ष एकत्र येऊन तिसरा पर्याय देऊ शकतील.

राज ठाकरे यांच्या या राजकीय भेटीगाठींमागे तेच राजकारण आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने जोरदार फटका दिल्याने शहाणे झालेले विरोधी पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात यशस्वी झाले तरच सक्षम पर्याय उभा राहू शकतो. अन्यथा राजू शेट्टी, राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच राहतील. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीला पंढरपुरात एकत्र विठ्ठल महापूजा करण्याची घोषणा करून आपल्या युतीची एकी पुन्हा दाखवून दिली आहे. साहजिकच आता विरोधी पक्षांना भेटीगाठी आणि चर्चा यापुढील पाऊल टाकावे लागेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)