स्वागत पुस्तकांचे : ग्राफिटी वॉल

-माधुरी तळवलकर

“ग्राफिटी वॉल’ या पुस्तकात कविता महाजन यांनी लिहिलेले विविध विषयावरचे लेख प्रकाशित केले आहेत. त्यातले विचार, शैली, तळमळ, विषयांचं वैविध्य हे सारंच लक्षणीय आहे. “साहित्यक्षेत्रातल्या अंधश्रद्धा’ या लेखात, अनेक प्रकारच्या पूर्वग्रहांचे बिनतोड आणि मिश्‍कील शैलीत खंडन केले आहे.

लेखनप्रक्रिया कशी असते? कोणी सांगू शकेल त्या अनुभूतीविषयी? लेखिका ते फार सुंदर शब्दात लिहिते. ती म्हणते, “जेव्हा लेखन सुरू असतं, तेव्हा त्या व्यक्‍तिरेखेत- त्या भूमिकेत लेखक शिरतो आणि लिहितो, त्या क्षणापुरतं ते पूर्णपणे प्रामाणिक असतं, ती भूमिका जगावीशी वाटते… लिहिताना खूप ऊबदार, सुरक्षित, निश्‍चित वाटत राहतं. कोऱ्या कागदावर सारे कोलाहल शांत होत जातात.’ लेखिकेला काव्याविषयी जिव्हाळा असल्यानं एका कवयित्रीनं केलेलं चिंतन वाचायला मिळण्याची संधी या पुस्तकात वारंवार मिळते. ती म्हणते, “कविता ही माझी श्‍वास घ्यायची जागा आहे.’

संपूर्ण पुस्तकात कुठल्या ना कुठल्या निमित्तानं लेखिका सतत स्वतःचा शोध घेत असल्याचं जाणवतं. स्वतःला तपासून पाहते, सोलून काढते. लिहावंसं का वाटतं? दुःख, वेदना, आजार, दुरावे, नकार, मृत्यू… असं सारं लिहितानाही मनाला बरं का वाटत असावं? लेखकानं “नुसतं लेखन’ करीत राहणं बरोबर आहे का? जे शब्द बाईच्या कवितेत चालत नाहीत, ते पुरुषानी लिहिले तर छापले जातात, असं का? आपल्याच बाईपणात गुरफटण्याचं सोडून स्त्री पुरुषाविषयी कधी लिहिणार? असे असंख्य प्रश्‍न! या पुस्तकात एकूण चाळीस लेख आहेत. प्रत्येक लेखात एक नवा विचार, नवा दृष्टिकोन, नवा शोध! एका लेखातील “थोडीशी मुलं आणि बाकी मुलं’ ही कविता मुळातूनच सगळी वाचायला हवी.

राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या “ग्राफिटी वॉल’ या पुस्तकात मधूनमधून काही छायाचित्रे टाकली आहेत. ती विषयानुरुप, बोलकी आहेत. विशेषतः आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्याचं छायाचित्र तर कधीच विसरता न येण्यासारखं! एकंदरीत मनस्वी लेखिकेचं हे प्रगल्भ चिंतन वाचण्यापूर्वी तुम्ही जे होतात, ते पुस्तक वाचून झाल्यावर तुम्ही राहात नाही. तुमच्यात नक्‍की बदल झालेला असतो. चांगल्या पुस्तकाचे याहून उत्तम लक्षण कोणतं असणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)