पुणे – दारूच्या नशेत एस.टी. चालविणाऱ्या चालकाला सहा महिने तुरूंगवास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.के.खराडे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
कुलदीप महादेव कराळे (वय 41, रा. उस्मानाबाद) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत वाहक शिवाजीराव प्रभाकर राऊत (वय 45, रा. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 23 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वाजता हडपसर येथे उघडकीस आली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अनंत चौधरी यांनी काम पाहिले.
चालक कराळे हा घटनेच्या दिवशी शिवाजीनगर ते उस्मानाबाद एस.टी. दारूच्या नशेत चालवत असताना आढळून आला. त्यावेळी त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याने दारूचे प्राशन केले असल्याचा अहवाल प्राप्त झाला. याविरोधात हडपसर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. ही गंभीर बाब आहे. तो प्रवाशांच्या जीवाशी खेळत होता. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. अनंत चौधरी यांनी केली.