पुणे – आयटी कंपनीतील कॅन्टिनवर छापा

पुणे – मगरपट्टा सिटीमधील एका आयटी कंपनीमधील केटरिंग चालविणाऱ्या व्यक्‍तींकडे परवाना नसल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली. या 14 केटरिंग चालकांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयटी कंपन्यांमधील केटरिंग चालकांवर कारवाई करण्याची पहिलीच कारवाई असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्या कार्यरत आहे. या आयटी कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करत आहेत. तेथील कर्मचाऱ्यांना केटरिंगमार्फत जेवणाची व्यवस्था करण्यात येते. हे केटरिंग चालक बाहेरील किचनमध्ये स्वयंपाक तयार करून आयटी कंपन्यांमध्ये जेवण आणून देतात. आयटी कंपनीमध्ये काऊंटर तयार करून कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था पुरविण्यात येतात. काही आयटी कंपन्यांमध्ये तीन शिफ्टमध्ये काम सुरू असते. या कर्मचाऱ्यांसाठी सकाळी नाश्‍ता, दुपारी जेवण, सायंकाळी पुन्हा नाश्‍ता त्याचबरोबर रात्रीचे जेवण अशी व्यवस्था करण्यात येते. त्यासाठी आयटी कंपन्या केटरिंग चालकांमार्फत जेवणाची व्यवस्था करते. त्यासाठी केटरिंग नेमणूकही आयटी कंपनीकडून करण्यात येते.

प्रत्येकी 25 हजारांचा दंड
शहरातील आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना व्यवस्थित व चांगल्या गुणवत्तेचे जेवण मिळते का, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तेथील केटरिंग व्यवस्थेची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मगरपट्टा सिटीमधील एका नामांकित आयटी कंपनीची तपासणी बुधवारी (दि.8) केली असता तेथील 14 केटरिंग चालकांकडे अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्‍त संपत देशमुख यांनी दिली.

आयटी कंपन्यांमधील केटरिंग चालकांनी “एफडीए’कडून परवाना घेणे आवश्‍यक आहे. विना परवाना केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार आहे.
– संपत देशमुख, सहायक आयुक्‍त, अन्न व औषध विभाग

Leave A Reply

Your email address will not be published.