पेहराव स्वातंत्र्य

प्रत्येक प्रसंगाचा एक ड्रेस असतो, असे मानले जाते. ठीकच आहे. तरीही त्या त्या प्रसंगाला कोणते ड्रेस असावेत, ते पारंपरिक विचारसरणीतून आलेले असते. खास करून स्त्रियांनी तसे राहणे अपेक्षित असते. त्यावेगळे विचार फार काही कोणी करत नाहीत. म्हणजे “खास लग्न समारंभासाठी मी काय मस्त सुटसुटीत, उंची जीन्स घेऊन ठेवली, ठेवणीतली अगदी!’ असे म्हणतांना कोणी स्त्री मला दिसलेली नाही. अशा जीन्स असतात की नाही मार्केटमध्ये, ते ही शोधावे लागेल. एरवी कधीही पंजाबी ड्रेससुद्धा न घालणाऱ्या मुली घरच्या-दारच्या “कार्यात” साडीबिडी नेसून येतात. त्यांना नेसायची नसली, तरी त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवली जाते. पण पुरुष मात्र जीन्स, पॅंट्‌स काहीही घालून आलेले चालतात. फार तर काही जण त्यांना स्वतःला आवडत असतील तर कुर्ते वगैरे घालतात. पण ती त्यांची आवड असते. “पुरुष अमक्‍याच कपड्यात कसा छान दिसतो. असेच अंगभर कपडे पुरुषांना शोभतात”, वगैरे म्हणत ते त्यांच्यावर कोणी लादलेले नसते.

प्रत्येक प्रसंगाचा एक ड्रेस कोड असतो, ह्या विचाराचे अंध अनुकरण देखील फार होते. हा तर समाजमनाचे वर्तन तपासायचा मानसशास्त्राचा विषयच होऊ शकतो. उदाहरणच द्यायचे झाले, तर तबलावादक बघा! पायावर शाल, रुमाल, काहीतरी कापड टाकून बसलेला दिसतो. तसा न बसलेला तबला वादक शोधून सापडत नाही. असे का करत असतात ते?
पायाला थंडी वाजते म्हणून? आतली पॅन्ट फाटलेली असायची शक्‍यता असते म्हणून? तळपाय खूपच घाण असतात म्हणून?

प्रेक्षकांना पाय दिसू नयेत म्हणून म्हणायला गेले, तर सगळेच काही कायम प्रेक्षकांकडे पाय करून बसलेले नसतात. त्यातून कितीसे असे पाऊल दिसणार?

पण एकाने पायावर शाल टाकली, सगळेच तसे करायला लागले! हे का करतोय, ह्या विचाराच्या खोलात कोणी सहसा जात नाहीत. शास्त्रीय संगीत, वादन कार्यक्रमाचा एक ड्रेस वर्षानुवर्षे ठरलेला असतो. शास्त्रीय संगीत गाणारी, वाजवणारी व्यक्ती वेगळे कपडे घालून सादरीकरण करतांना क्वचितच दिसते. अगदी नव्याने येणारे कलाकार देखील तसेच वागायला लागतात. म्हणजे टी शर्ट, जीन्स घालून अशा बैठकीतल्या कार्यक्रमात कोणीही मुलगा-मुलगी मालकंस गाताना, सतार, सरोद, तबला वाजवतांना दिसत नाही. इथे कोणाला काय आवडेल ते त्याने करावे, हे गृहीतच धरलेले असते. तक्रार म्हणून हे मांडत नसून फॅक्‍टस आणि निरीक्षण म्हणून मांडते आहे. त्यावर निष्कर्ष देखील काढलेला नाही. पेहरावाच्या बाबत काय संकेत पाळतात लोक, ह्याबद्दलचे साधे निरीक्षण, इतकाच मुद्दा! कोणी म्हणेल, पुरुषांनाही ड्रेस कोड असतो. ड्रेस कोड असतील लाख. पण ड्रेस कोड म्हणून साडी लादणे, खासकरून शिक्षकी पेशात आणि पुरुष शिक्षकांना मात्र धोतर न लादणे, सोयीचा पेहराव आपसूक मिळणे, हा फरक लोक लक्षात घेत नाहीत! जर भारतीयच कपडे परिधान करायचे असतील, तर पुरुषांना देखील धोतर-टोपीकडे वळवावे लागेल. धोतर नेसून मुंबईच्या ट्रेनमध्ये रोजचा प्रवास करणे जितके गैरसोयीचे असते, तितकीच गैरसोयीची साडीही असते. पण स्त्रीला असा पेहराव ड्रेसकोड म्हणून मान्यच करावा लागतो. तो ठरवणारे मात्र पेहराव स्वातंत्र्य उपभोगत असतात.

ह्या सगळ्यांत मला फाल्गुनी पाठक जरा वेगळी दिसते. तिची गायकी काय-कशी आणि वर्षभर ती काय गाते, हा मुद्दा नाही. सांस्कृतिक-धार्मिक का असेना पण त्या कार्यक्रमात तिच्या ड्रेसचे वेगळेपण उठून दिसते. नटून मुरडून स्त्रीत्व सांडेल इतका नट्टापट्टा करून येणाऱ्या मुलींपुढेही ती तिला हव्या त्या पेहरावात असते. तिला चक्क धार्मिक रूढी-परंपरा पाळणारा मॉब तसे स्वीकारतोही. तर, हे दोन्ही बाजूचे सहजच झालेले स्वीकारणे मला छान वाटते. कपडे म्हणजे आपली सोय काय ते आधी बघणे, असा फंडा ती बिनधास्त वापरतांना दिसते. आपण सुरू करू ती फॅशन!

– प्राची पाठक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)