भक्‍ती हेच मुख्य सूत्र

– डॉ. विनोद गोरवाडकर

भारतवर्षात धर्माधिष्टित निर्माण झालेल्या आणि ईश्‍वराची प्राप्ती हे ध्येय असणाऱ्या सर्वच संप्रदायांच्या वाटचालीचे मुख्य सूत्र भक्‍ती हेच होते. भक्‍तिमार्गावरून वाटचाल करीत राहिल्यास एक ना एक दिवस ईश्‍वरासन्निध जाणे शक्‍य होईल, अशी खात्री यातील वेळोवेळी संप्रदायाचे नेतृत्व करणाऱ्यांना आणि त्यासोबत असणाऱ्या अनुयायांना वाटत होती. त्यामुळे या संप्रदायांच्या आदी “भक्‍ती’ हा शब्द लावला गेला आहे. भलेही संप्रदायाचे नाव नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय वा अजून काही असेल पण प्रत्येक संप्रदायाचे वैशिष्ट्य काय तर हा संप्रदाय भक्‍तीमार्गावर चालणारा होता आणि आहे. वारकरी संप्रदायानेदेखील भक्‍ती हेच प्रमुख सूत्र आचरणासाठी वापरले आहे. मुख्य म्हणजे वारकरी संप्रदायाचा भक्‍तिमार्ग सामान्यातल्या सामान्य माणसालाही सहजगत्या आचरता येईल असा आहे.

अध्यात्मात भक्‍तीचे वर्णन “श्रवण कीर्तनं। विष्णोःस्मरणं पाद सेवनं। अर्चनं वंदनं। दास्यं सख्यं आत्मनिवेदन’ असे करण्यात आले आहे. या वर्णनानुसार भक्‍तीचे नऊ प्रकार पडतात. त्यातूनच “नवविधाभक्‍ती’ ही संज्ञा रूढ झालेली आहे. यातील कोणतीही भक्‍ती आत्मनिर्धारपूर्वक, प्रांजळपणे, शुद्ध अंतःकरणाने केल्यास निश्‍चितपणे भक्‍त आपल्या लक्ष्यापर्यंत जाऊन पोहोचतो अशी धारणा आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे भक्‍तीचे नऊ प्रकार थोडक्‍यात पुढीलप्रमाणे उद्‌धृत करता येतील. हरिकथेचे मनःपूर्वक श्रवण केल्याने श्रवणभक्‍ती शक्‍य होते. संत महंतांनी लिहून ठेवलेल्या साहित्याच्या निरूपणासोबत संगीताच्या साथीने गायन करून कीर्तनभक्‍ती साधावी. स्मरणभक्‍ती म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाने परमात्मस्वरुपी एकरूपता प्राप्त होते. जी नामाक्षरे श्रवणी पडतात, ती हृदयात आत्मप्रकाशाची दिप्ती उजळवून टाकतात. पादसेवन भक्‍ती म्हणजे ईश्‍वराच्या मूर्तीचे वा सद्‌गुरूच्या पायाचे तीर्थ घेऊन केली असता शुचिर्भुतता अनुभवता येते. सद्‌गुरूचे पादसेवन म्हणजे अध्यात्मविद्येचे माहेरघर समजले जाते. अर्चनभक्‍ती म्हणजे पूजा. पूजा केल्याने ही भक्‍ती साध्य होते. वंदनभक्‍तीत ईश्‍वराला मनःपूर्वक वंदन करण्याची अट आहे.

दास्य म्हणजे सेवा. ही जीवनाला सौंदर्य प्राप्त करून देणारी भक्‍ती आहे. दास्य भक्‍तीने परमेश्‍वर आणि सद्‌गुरू आपलेसे होतात. सख्यभक्‍ती म्हणजे देवाशी ऐक्‍यभावाने मित्रत्वाने नाते जुळणे होय. सख्यत्व हे सर्वश्रेष्ठ नाते आहे. सख्यभक्‍तीमुळे देवाचे गुण आपल्याला प्राप्त होतात आणि शेवटची नववी भक्‍ती म्हणजे आत्मनिवेदन, ही श्रेष्ठ भक्‍ती होय. परमेश्‍वराला अंतःकरणात साठवून त्याचा साक्षात्कार करवून आत्म्याचे ईश्‍वररुपी परतत्त्वाशी मिलन आत्मनिवेदन भक्‍तीमध्ये होत असते. भक्‍तीचे नऊ प्रकार ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीच्या सहाव्या अध्यायात सद्‌गुरूला अर्पण केले आहेत. कारण भक्‍तीच्या सर्व प्रकारात सद्‌गुरू हे केंद्रस्थानी आहेत.

संतांचा सारा भर भक्‍तीवर होता. वारकरी संप्रदायाने भक्‍तीच्या नऊ प्रकारांतील “नामस्मरण’ या भक्‍तीप्रकारावर अधिक भर दिला. नामस्मरणाचा मार्ग स्वीकारण्यास सुलभ, कुठेही आणि कुठल्याही अवस्थेत करता येईल असा असल्याने वारकऱ्यांनी तो अंगीकारला. संतांना ज्ञान-कर्म आमि भक्‍ती अशी त्रिसूत्री अभिप्रेत होती. भक्‍तीमार्गावर चालताना ज्ञान आणि कर्माची जोड त्याल हवीच असा संतांनी आग्रह धरला.

ज्ञानेश्‍वरांनी भक्‍तीला पाचवा पुरुषार्थ मानले आहे. त्यामुळे “चहू पुरुषार्था शिरी। भक्‍ती जैसी’ असे ते ज्ञानेश्‍वरीत म्हणतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ दाखवितानाच भक्‍तीही त्यांच्यासोबत असावयास हवी हा संतांचा आग्रह भक्‍तीमार्ग किती श्रेष्ठ आहे हेच सिद्ध करते. “चहू पुरुषार्थाचे माथा। भक्‍ती सर्वथा मज पढियता।’ असे एकनाथांनी सांगितले आहे. “तुका म्हणे मुगुटमणी हरिभक्‍ती। आणिक विश्रांती आरतीया’ असं म्हणून पुढे “मोक्ष तुमच्या देवा। दुर्लभ तो तुम्ही ठेवा। मग भक्‍तीची आवडी। नाही अंतरी ते गोडी’ असं तुकाराम महाराज मोठ्या आग्रहाने सांगतात. “वारकरी संप्रदाय उदय व विस्तार’ या ग्रंथात भा. पं. बहिरट आणि प. ज्ञा. भालेराव यांनी ज्ञानदेवांची भक्‍ती या संदर्भात केलेले विवेचन महत्त्वाचे ठरते. ते म्हणतात, “श्रीज्ञानेश्‍वर महाराज हे स्वतः पूर्ण आत्मानुभवी होते. त्यांनी योगाच्या समाधीचा, मुक्‍तीतील आत्मानंदाचा व भक्‍तीच्या प्रेमसुखाचा हे सर्वच अनुभव घेतले होते व त्या अनुभवाच्या आधारेच त्यांनी भक्‍तीस सर्वोच्च स्थान दिले आहे.’

वारकरी संप्रदायाने स्वीकारलेला हा सुलभ भक्‍तीमार्ग वारकऱ्याला मनाने श्री विठ्ठलाच्या जवळ घेऊन जातो. म्हणूनच प्रातःकाळी जागे झाले श्री. पांडुरंगाचे ध्यान करून नामस्मरण करून, त्याची मूर्ती मनात आणून तिच्या चरणावर डोके ठेवून आपल्या नित्यक्रमास लागण्याची सवय वारकऱ्याला असते. भक्‍तीने भविष्याला सामोरे जाण्याची शक्‍ती मिळते आणि या शक्‍तीच्या आधारे भक्‍तीमार्गावर चालत चालत मुक्‍तीपर्यंत पोहोचणे शक्‍य होते, हे वेगळे सांगावयास नको.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)