पुणे – दारू पिण्यास 20 रुपये न दिल्याने कैचीने डावे कानाच्या मागील बाजूस वार करून जखमी करणाऱ्याला तीन महिने सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना पानसरे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास दहा दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
लियाकत बिलाल शेख (वय 27, रा. लोहगाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत नितीन बाळासाहेब गायकवाड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 18 ऑक्टोबर 2017 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे यांनी मदत केली. फिर्यादी हे महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील इशान्य मॉलसमोरील गोडाऊनमध्ये कारागीर म्हणून कार्यरत होते. तेथे ते साफासेट बनविण्याचे काम करत असत. तेथे त्यांच्या तोंड ओळखीचा लिकायत हा नेहमी जात असत. त्यांना तंबाखू, चहा आणि खर्चासाठी पैसे मागत असत.
घटनेच्या दिवशी तो तेथे गेला. त्याने फिर्यादींना तंबाखू मागितली. मात्र, त्यांनी नसल्याचे सांगितले. त्यावेळी तो त्यांना शिवीगाळ करू लागला. त्यावेळी त्यांनी शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने दारू पिण्यास 20 रुपये मागितले. त्यालाही त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्याने कैचीने वार करत त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास करून येरवडा पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तीवाद करताना त्याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी वकील कोळी यांनी केली.