दीडशे फूट दरीत कार कोसळली

दोघेही जखमी प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर जखमी अवस्थेतच स्वतः गाठले रुग्णालय
 
पुणे – कात्रज जांभुळवाडी दरीपुलावरून बलेनो कार 150 फूट दरीत कोसळली. बंगळुरू महामार्गावरून पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात घडला. या कारमध्ये भारती विद्यापीठ हॉस्पिटलमधील दोन डॉक्‍टर होते. हे दोन्ही डॉक्‍टर जखमी झाल्यावर त्यांनी मित्राच्या मदतीने रुग्णालय गाठले.

आतमन रैना (24), शहापूर महंमद (24) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघांनीही एमबीबीएस पूर्ण केले असून ते सध्या भारती हॉस्पिटलमध्येच प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर म्हणून कार्यरत होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली. कात्रज जांभुळवाडी दरीपुलावरुन बलेनो कार क्रमांक एम.एच-12 एन.जे.5536 भरधाव वेगात बंगळुरूकडून पुण्याच्या दिशेने येत होती. ती बोगद्याबाहेर येताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

यामुळे कार पुलाच्या कठड्याला जोरात धडकली. यामध्ये दोघेही कारसह दरीमध्ये कोसळले. ही दरी तब्बल दीडशे फूट खोल आहे. कारमधील दोघेही जखमी अवस्थेत भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल झाले. त्यांना किरकोळ जखम झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी अग्निशमनदल आणि पोलिसांना अपघाताची माहिती देताच जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांना गाडी चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत आढळली. मात्र, गाडीमध्ये तसेच आजूबाजूला कोणीही जखमी अवस्थेत आढळले नाही.

जखमींच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही जेवणासाठी खेड शिवापूर येथे गेले होते. तेथून परतत असताना बोगदा ओलांडल्यावर दत्तनगरकडे गाडी वळवताना त्यांचे नियंत्रण सुटले. यानंतर गाडी थेट दरीतून कोलांटउड्या खात दरीत गेली. गाडीला एअरबॅग असल्याने दोघेही बालंबाल बचावले. यानंतर घटनास्थळी मित्र दाखल झाल्यावर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)