ग्रेट पुस्तक : अलमोस्ट सिंगल-अद्वैता कला

अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार..

आज मी तुम्हाला “अलमोस्ट सिंगल” या चटपटीत पुस्तकाचा माझा अनुभव सांगणार आहे.. या पुस्तकाच्या लेखिका अद्वैता कला या असून याचा मराठी अनुवाद आशुतोष उकिडवे यांनी केला आहे. ही कथा दोन मैत्रिणींची. दोघींही वयाची तिशी ओलांडून गेली तरी अजून अविवाहित आहेत. लग्नाच्या बाजारात अद्यापही त्या बोहल्यावर चढल्या नाहीत. आपली पोटापाण्याची व्यवस्था करून त्या मस्त मजेत आपले स्वछंदी आयुष्य जगत असतात. आयेशा अन मिशा या त्या दोघी मैत्रिणी आहेत. त्या दोघीना त्यांची मैत्रीण अनुष्का हिची सुद्धा साथ लाभते. आयेशा ही ग्रॅंड ऑर्किड नावाच्या हॉटेलमधे गेस्ट रिलेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत असते. त्यामुळे तिला नेहमीच विविध माणसांचे चांगले, वाईट, विनोदी अनुभव येत असतात. तिचा स्त्रीलंपट बॉस तिच्याशी मात्र फटकून वागत असतो. आयेशाच्या आयुष्यात बरेच चढउतार येतात अन त्यातूनचं कधी कथेला गंभीर, तर कधी विनोदी वळण लागते.

समलिंगी लोकांचे मनोविश्‍व, त्यांच्या मनाचे विविध पैलू, त्यांना वाटणारे परस्पर आकर्षण आणि त्यातून निर्माण झालेली त्यांची जिवाभावाची मैत्री. या सगळ्यांचे भावविश्‍व्‌ मांडताना लेखिका हातचे काही राखून ठेवत नाही. मिशा तिची मैत्रीण आहे. ती सुखसंपन्न घरातील पंजाबी मुलगी असून साधारण रूप अन बिनधास्त स्वभाव यामुळे लग्नाच्या बोहल्यावर चढायला झालेला उशीर,अन याच कारणासाठी नोकरी निमित्ताने घर सोडणे. घर सोडून आलेली मिशा स्वतःला या बिनधास्त जगात मुक्तछंद बागडू देते. शेजारचे तिच्या रोजच्या उशिरा येण्याच्या, बिनधास्त असण्याच्या स्वभावावर नाराज असतात. ते तिच्या हालचालीवर पूर्ण लक्ष ठेवून असतात. त्यांच्या या लक्ष ठेवण्यातूनच अनेक वेळा विनोद निर्माण होतो. प्रेम, वैवाहिक जीवन, समलिंगी संबंध, त्याच्याकडे पाहण्याचा लोकांना दृष्टिकोन अन या सगळ्याला विनोदाचे असलेले अंग या सर्व गोष्टींमुळे निश्‍चितच हे पुस्तक वेगळे ठरते. लेखिकेबद्दल सांगायचे झाल्यास अद्वैता कला या बंडखोर, थोड्याश्‍या गोंधळलेल्या, आणि तरीही बहुआयामी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत अमेरिकेत जॉर्जिया या ठिकाणी त्यांचे कला शाखेचे शिक्षण झाले आहे. त्यांनी अगदी ग्रंथपालापासून ते शेफ पर्यंत विविध नोकऱ्या केल्या आहेत आणि त्यातूनच त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व बनत गेले आहे.

अद्वैत कला या धडाडीच्या लेखिकेच्या या पुस्तकाचा अनुवाद मेनका प्रकाशनने प्रकशित केला आहे.. वेगळ्या धाटणीचे हे पुस्तक नक्की वाचा धन्यवाद… लवकरच नवीन पुस्तकांसह आपणास भेटेन. धन्यवाद.

– मनीषा संदीप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)