भोर : राष्ट्रवादीला जोर

आघाडीच्या मुद्यावर कॉंग्रेसला अद्यापही चिंता

– संतोष गव्हाणे

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वीच दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवारांत धुसफुस सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आल्यानंतर याबाबतची चाचपणी सुरू असल्याने मतदारसंघातील “आघाडी’चे वातावरणही ढवळले गेले आहे. भोर मतदारसंघातील स्थिती कॉंग्रेससाठी तर अतिशय चिंताजनक ठरणारी असून कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना यावेळी ऐन निवडणुकीत राजकीय दगाफटका होईल, असे मानले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मदत मिळाल्याने कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या मतदार संघात विधानसभेला कॉंग्रेसच्या उमेदवारांना मदत करण्याचा निर्णय आघाडी धर्मानुसार घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळाल्यानंतर विधानसभेकरीता इच्छुक आणि प्रबळ दावेदार असलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवारांसाठी निवडणूक सोपी झाल्याचे मानले जावू लागले होते. परंतु, ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभरातील विधानसभा मतदार संघाची चाचपणी करण्याकरीता विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागविले होते. यानुसार कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या मतदार संघातूनच राष्ट्रवादीच्या अधिकाधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज पक्षाकडे पाठविले आहेत. यामध्ये भोर मतदार संघातूनही असे अर्ज गेले आहेत. भोर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूून भोर, वेल्हे व मुळशी तालुक्‍यातून सात इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने या मतदार संघातील राजकीय चर्चेला वेगळेच वळण लागले आहे. मुळशीतून चार तर भोर आणि वेल्हेतून प्रत्येकी एकाने राष्ट्रवादीची उमेदवारी मागितल्याने या पक्षातच पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

भोर तालुक्‍यातून 2014 मध्ये संग्राम थोपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक मैदानात उतरलेले माजी उपसभापती विक्रम काशिनाथ खुटवडसह वेल्हेमधून राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष व जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक तानाजी दगडू मांगडे यांनीही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली आहे. मुळशी तालुक्‍यातून पाच अर्ज पक्षाकडे गेले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य व गटनेते शांताराम बाजीराव इंगवले, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व माजी तालुकाध्यक्ष शंकर हिरामण मांडेकर, भोर विधानसभा अध्यक्ष सुनील काशिना चांदेरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता सुहास दगडे यांच्यासह बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र राजाराम कंधारे यांनी भोरमधून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. भोरसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे स्पष्ट झालेले असताना उमेदवारी पक्षाकडे सात अर्ज गेल्याने तर्क-वितर्काला उधारण आले आहे. अन्य इच्छुकांची संख्याही मोठी असल्याने आघाडीऐवजी बिघाडी होण्याचीच अधिक चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी भोरमधील कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी ऐनवेळी काम केले नसल्याने भोरमधून सुळे यांना अल्पमतांची आघाडी मिळाली असल्याचा तसेच याकरीता विधानसभेत कॉंग्रेसला किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते रणजित शिवतरे यांनी केला होता. यामुळे भोरमध्ये राजकीय वांदग उठले होते, याला प्रत्युत्तर म्हणून कॉंग्रसचे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनीही शिवतरे यांना स्वत:ची किंमत ओळखावी, असे म्हणत विधानसभेचे आव्हान दिले होते. लोकसभा निवडणुकीत भोर, वेल्हे व मुळशीत कॉंग्रेसच्या सहकाऱ्यातूनच सुप्रिया सुळे यांना मताधिक्‍य मिळाल्याचा दावा आवाळे यांनी केला होता. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या श्रेयवादाची ठिणगी आघाडीत पडणार का? अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीकडून भोर विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागिवल्यानंतर दोन्ही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांत धुसफुस सुरू झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीकडून इच्छुकांची चाचपणी होत असल्याने भोर विधानसभेसाठी आघाडीचे स्वरूप नेमके काय असणार, याबाबतची उत्सुकता ताणली जावू लागली आहे.

…मग कशाला मागविले अर्ज
लोकसभा निवडणुकीवेळी मदत करा…, असे आवाहन करीत विधानसभेला आघाडी धर्म नक्की पाळू, असे आश्‍वासन राष्ट्रवादीकडून दिले गेलेले असताना या पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज का मागविले. विशेष, म्हणजे आघाडीच्या जागा वाटपात कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या विधानसभा मतदार संघातूनही अर्ज मागविले आहेत. आघाडीचा निर्णय जवळपास झालेला असताना राष्ट्रवादीने असे अर्ज का मागविले? असा संतापजनक सवाल कॉंग्रेसच्या पदाधिकारी, मंडळींकडून केला जात आहे. अर्ज मागवायचेच होत तर राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातून मागवायला हवे होते, असा सूर आळवला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)