बँक हमीची तरतूद

सध्या जाहिरातबाजीचा जमाना आहे. मग एखादे उत्पादन असो किंवा कर्जविषयक जाहिरात असो, जाहिरात पाहिली की ग्राहकराजा हुरळून जातो. अशी मंडळी लगेचच शॉपिंगच्या तयारीला लागतात. अशा स्थितीत वित्तीय कंपन्यांच्या देखील जाहिराती आकर्षक असतात.

होम लोन खूपच सोपे, कमी कागदपत्रांसह तातडीने कर्ज मंजुरी, कोणतेही छुपे कर नाही अशी भूरळ पाडणाऱ्या जाहिराती पाहून गरजूंचे पाय बॅंकेकडे वळतात. मात्र प्रत्यक्षात गृहकर्ज मिळवण्यासाठी अर्ज सादर करताना अनेक द्रविडी प्राणायाम करावे लागतात. अर्थात त्याचा कोठेही उल्लेख जाहिरातीत केलेला नसतो. ग्राहकांना अडचणीच्या वाटणाऱ्या कोणत्याही बाबींचा उल्लेख सोयीस्कररित्या टाळला जातो. शेवटी बॅंकेत गेल्यावर कर्जाचे मायाजाल कळते. म्हणूनच बॅंक असो किंवा वित्तिय कंपनी गृहकर्ज घेणे वाटते तेवढे सोपे नाही. अनेक सोपस्कार पार पाडल्यानंतर गृहकर्जाचा धनादेश आपल्या हाती पडतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्ज देताना बॅंकेला कर्जदाराकडून हमी हवी असते. मग जामीनदाराच्या रुपातून किंवा वास्तूच्या रुपातून असो, ही हमी मिळवण्याबाबत बॅंक आग्रही असतात. हमी असल्याशिवाय बॅंका कर्ज देण्यात टाळाटाळ करतात.

पहिला मार्ग : साधारणपणे मालमत्तेचा मालक असलेल्या व्यक्तीला कागदपत्रे बॅंकेत सादर करावे लागतात. यात फारशी प्रक्रिया करावी लागत नाही. मालमत्ता बॅंकेत गहाण ठेवणे हा हमी मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

दुसरा मार्ग : कर्जदाराला मालमत्ता गहाण ठेवत असल्याचे कागदपत्रे सहीनिशी बॅंकेला सादर करावे लागतात. जर कर्जदार व्यक्तीने वेळेवर पैसे भरले नाही तर बॅंक संबंधित व्यक्तीविरुद्ध त्या कागदपत्रांचा उपयोग करू शकते.

तिसरा मार्ग : हा मार्ग म्हणजे मालमत्ता मॉर्गेज करणे. हा सुरक्षित उपाय मानला जातो. यात कोणत्याही प्रकारची कागदपत्रे गहाण ठेवण्याची गरज भासत नाही. मात्र कर्जदार आणि बॅंक यांच्यात करार होतो. तो करार बॉंडवर नोंदणीकृत केला जातो. ही महागडी प्रक्रिया आहे. कारण कर्जदाराला स्टॅंप आणि रजिस्ट्रेशनसाठी शुल्क द्यावे लागते. यानुसार कर्जदाराला मालमत्ता बॅंकेला ट्रान्सफर करावी लागते. हा करार कर्जफेड झाल्यानंतरच परत मिळतो.

चौथा मार्ग : गृहकर्ज दोघांच्या नावावर घेतले तर बॅंका काही प्रमाणात कर्ज देण्याबाबत लवचिक राहतात. पती-पत्नी, मुलगा-वडील, मुलगा-आई असे संयुक्तपणे कर्ज घेतल्यास जामीनदाराची गरज भासत नाही. एवढेच नाही तर दोघेही नोकरदार असेल तर कर्ज झटपट मिळते आणि कर्जाची रक्कमही मनाप्रमाणे हाती पडते. या कृतीने जामीनदारासाठी मित्र किंवा नातेवाईक पाहण्याची गरज भासत नाही.

लक्षात ठेवा : मालमत्ता गहाण ठेवल्यानंतर मालक ती मालमत्ता विकू शकत नाही. त्यामुळे कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी रजिस्ट्रेशन कार्यालयात संबंधित मालमत्तेची चौकशी करावी. ती मालमत्ता कोणत्या बॅंकेत गहाण तर नाही ना, याची खातरजमा करावी. जर मालमत्ता खरेदीदाराने एकापेक्षा अधिक बॅंकेकडून कर्ज घेतले असेल तर आणि कर्जाची फेड झाली नसेल तर अशा स्थितीत बॅंका मालमत्तेची विक्री करून आपापसात रकमेची विभागणी होते.

– अपर्णा देवकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)