रायपूर: नक्षलप्रभावीत सुकमा जिल्ह्यात गंभीर आजारी असलेल्या एका मुलाचा जीव सीआरपीएफच्या जवानांनी सुमारे आठ किलोमीटर पायपीट करून वाचवल्याची घटना नुकतीच समोर आली असुन सीआरपीएफच्या जवानांच्या कार्याची दखल घेत सर्वांकडून त्यांचे कौतूक केले जात आहे.
नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या छत्तीगडमधील सुकमा जिल्ह्यात गस्त घातल असताना सीआरपीएफच्या जवानांना गुमोडी गावात आजारामुळे प्रकृती चिंताजनक असलेला एक 13 वर्षीय मुलगा दिसला. मुलाची गंभीर अवस्था पाहिल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी या मुलाला खाटेवर बसवून सुमारे आठ किलोमीटर पायपीट करून कोंडासावली येथील कॅम्पमध्ये नेले. तेथे या मुलावर उपचार करण्यात आले. आता त्या मुलाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.