जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आज संयुक्त राष्ट्र संघाकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबत भारताचे संयुक्त राष्ट्र संघाचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली होती.
मसूद अझहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे, यासाठी भारत गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील होता मात्र दरवेळी भारताच्या या मागणीला चीनकडून खोडा घातला जात होता.
दरम्यान, बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानाकडून सातत्याने मसूदच्या वास्तव्याचे ठिकाण बदलले जात असल्याची माहिती सामोर येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एक प्रकारे मसूदची पळापळ सुरु आहे. बालाकोट एअर स्ट्राइनंतर पाकिस्तानी लष्कराने मसूदला रावळपिंडीच्या बेस हॉस्पिटलमधून बहावलपूर येथील गोठ गन्नी येथे हलवले होते. आता त्याला इस्लामाबादपासून ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरावाला शेखपूरा येथील एका मदरशामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे.