भारताला क्षेपणास्र खरेदीवरून अमेरिकेचा पुन्हा इशारा

वॉशिंग्टन – भारत रशियाकडून अत्याधुनिक एस-400 क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. भारताचा हा निर्णय दीर्घ कालावाधीसाठी भारताच्या हिताचा नसेल, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले. या व्यवहारामुळे दोन्ही देशांच्या सामरिक भागीदारीवरही परिणाम होऊ शकतो, असा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे.

दक्षिण आशियाई देशांनी कोणाकडून संरक्षण सामग्री खरेदी करावी, याचा निर्णय त्याच देशांनी घ्यावा. करारांनुसार भारताने अमेरिकेकडून अधिक संरक्षण सामग्री खरेदी करणे आवश्‍यक आहे. परंतु भारत रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र खरेदी करत आहे, असे अमेरिकेचे सहयोगी परराष्ट्रमंत्री अलायस वेल्स यांनी सांगितले.

ट्रम्प सरकारचा उद्देश भारताच्या संरक्षण व्यवहारात मदत करण्याचा आहे आणि संरक्षण व्यवहारात अमेरिका भारताचा सर्वात मोठा सहकारी आहे. रशिया आणि भारतात सुरू असलेल्या व्यवहाराचा परिणाम दोन्ही देशांच्या परस्पर सहकार्यावर होईल, असेही त्यांनी नमूद केले.

अमेरिकेने भारताला एस-400 ऐवजी पॅट्रियॉट -3 या क्षेपणास्त्राची खरेदी करण्याची ऑफर दिली होती. अमेरिका भारताला हाय अल्टीट्यूड एरिया डिफेन्स आणि पेट्रियॉट-3 ची विक्री करू इच्छीत असल्याचे संकेतही यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने दिले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या विस्तृत चर्चेनंतर भारत आणि रशियामध्ये 5 अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला होता. यामध्ये एस-400 क्षेपणास्त्रांच्या खरेदीचाही सहभाग आहे.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोंपियो यांच्या भारत दौऱ्यापूर्वी ओसाका येथील जी-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here