गंगटोक – उत्तर सिक्कीम जिल्ह्यात झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे तब्बल 300 याकचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मुकुथांग भागामध्ये 250 आणि युमथांगमध्ये 50 याकचे सांगाडे आढळून आले आहेत. उत्तर सिक्कीम जिल्ह्याचे दंडाधिकारी राज यादव यांनी ही बाब मान्य केली आहे. मुकुथांग आणि युमथांग या भागांमध्ये डिसेंबर 2018 पासून बर्फवृष्टी होत राहिली आहे, असे यादव यांनी सांगितले.
डिसेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे या याकना पुरेसे खाद्य उपलब्ध झालेले नव्हते. त्यामुळे उपासमारीमुळे या याकचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. पशूवैद्यकीय विभागाचे कर्मचारी मुकुथांग भागामध्ये पोहोचले आहेत. या पथकाने याकना जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक पोषक खाद्य बरोबर नेले आहे. मरण पावलेल्या याकच्या मृत्यूचे नेमके कारण तपासण्यासाठी वैद्यकीय पथकही तेथे नेण्यात आले आहे.
हे याक मुकुथांगमधील 15 आणि युमथांगमधील 10 कुटुंबांच्या मालकीचे होते. याकच्या मृत्यूमुळे या कुटुंबांना भरपाई देण्यात येणार आहे.