पिंपरी – स्मार्ट सिटी कंपनीच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून महापालिकेचे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांची गच्छंती करण्यात आली होती. मात्र, आयुक्त राजेश पाटील यांनी पुन्हा पोमण यांच्याकडे स्मार्ट सिटीतील काही प्रकल्पांचे कामकाज सोपवले आहे. पोमण हे वारंवार वादग्रस्त ठरल्यानंतरही आयुक्तांनी दाखविलेल्या मर्जीची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
स्मार्ट सिटी कंपनी स्थापनेपासून निळकंठ पोमण यांच्याकडे सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबादारी होती. महापालिका आयुक्त हे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मात्र, वेगवेगळे आयुक्त असताना प्रत्यक्ष कारभार पोमण यांनीच पाहिल्याचे बोलले जाते. सल्लागार संस्थांची नेमणूक व मोठ-मोठ्या रकक्मेच्या निविदांचे कामकाज करताना त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. मात्र, पाच वर्षातील स्मार्ट सिटीतील कारभारावर असंख्य आरोप झाले. त्यात पोमण यांच्या कार्यपध्दतीवरूनही पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडून स्मार्ट सिटीचे कामकाज काढण्यात आले होते. त्यांच्या जागी प्रतिनियुक्तीवरील अधिकारी किरणराज यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त पाटील यांनी गुरुवारी (दि.28) स्वतंत्र आदेश काढल्याचे समोर आले आहे.
यामध्ये निळकंठ पोमण यांच्याकडे पुन्हा स्मार्ट सिटीतील काही प्रकल्पांचे कामकाज सोपविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. काही दिवसातच आयुक्त यांनी निर्णय बदलला. स्मार्ट सिटी कंपनीत राजकीय पदाधिकारी संचालक होते. तसेच, अनेक वर्षे पालिकेचा महत्त्वाचा विभाग पोमण सांभाळत आहेत. त्यांच्याकडून महत्त्वाचे कामकाज काढून घेतले होते. सिटी नेटवर्क, कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर, ई-क्लासरूम, जीआयस बेस ईआरपी आदी प्रकल्पांचे कामकाज निळकंठ पोमण यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. ही कामे एल ऍन्ड टी, टेक महिंद्रा, बेनेट कोलेमन, ऍटॉसस अशा नामांकित कंपन्यांकडे आहेत. या सर्वच कामांमध्ये वेळोवेळी आरोप झाले असून ते वादाचा विषय ठरलेला आहे.