रस्त्यावरील दिवा आणि खाटीक पक्षी

माळरानाच्या अलीकडे, समोर तिकडे एक ब्रिटिशकालीन पांढरा दिवा रोज रात्री काही तास ऐटीत लागत असे. तो दिवा बघत बघत मी लहानाची मोठी झाले. निर्जन प्रदेश मोस्टली! हा दिवा केवळ आपल्यासाठी आहे, तो रॉयल आहे, म्हणून आपण देखील रॉयल…. अशी ऐट मनात तरी मी खूपच केली! समई लावून ज्योतीकडे एकटक बघत ध्यान करावे, तसं अभ्यासातून डोके वर काढून ह्या दिव्याला एकटक निरखून मी अनेक परीक्षा उत्तमोत्तम मार्कांनी पास झाले. हा पांढरा दिवा माझ्या सोबतच होता त्यापेक्षा खूप मोठा झाला. म्हातारा झाला. ब्रिटिश जाऊनदेखील त्याने जवळपास 60-65 वर्षे सेवा दिली! त्याची ऐट लोभस तर होतीच. पण सभोवार केवळ जंगलसदृश भाग आणि पाठ फिरवलेला हा दिवा. रोज काही तास पांढरा शांत-मंद प्रकाश देणारा.

ह्या दिव्याच्या खाचाखोचांमध्ये खाटीक पक्ष्याने घरटे केले. त्यामुळे दिव्याची आणि माझी जवळीक अजूनच वाढली. दोन, तीन वर्षे खाटकांच्या वेगवगळ्या जोडप्यांची तिथे रेलचेल असे. दिवा तेव्हाही लागत असे. कालांतराने दिवा लागणे बंद झाले. बुलडोझर आला, दिवा उखडून तिरपा झाला. तेव्हाही खाटकाचे बिऱ्हाड तिथे होते. तसेही ते आठ- दहा महिने राहिले. खाटीक तरीही मजेतच होते. एकदा दुसरा बुलडोझर आला आणि सगळे सपाट करून गेला. मग जमिनीखाली पाईप लाईन टाकणे सुरु झाले. फर्मान जोरदार असावे. केवळ दोन दिवसांत सगळे काम होऊन तसाच पाठमोरा दुसरा पिवळा दिवा तिथे आला. आता पोल धातूचा होता. ब्रिटिशकालीन पोल धातूचा नव्हता. हा दिवा देखील काटेकोरपणे संध्याकाळी अमुक वाजता सुरू आणि रात्री अकराला बंद होई. पहाटे परत एक तास लागून परत बंद होई. इथे खाटीक मात्र नव्हता.

खाटकाने आता केंद्र सरकारचा खांब सोडून राज्य सरकारचा खांब निवडला होता! आधी खाटीक पक्ष्याचा बसेरा पूर्वेला होता. आता राज्य सरकारी खांब दक्षिणेला असल्याने तो तिथे शिफ्ट झाला. खाटिकाची दोस्ती अजूनही सुरूच आहे. पण चार महिन्यांतच दुसरा बुलडोझर आला आणि त्याने हा पिवळा, पाठमोरा दिवा फटक्‍यात उखडून टाकला. पुन्हा साधारण सात आठ महिने कोणताच दिवा नव्हता. पाच महिन्यांपूर्वी रस्त्याच्या समोरच्या बाजूने पाईपलाईन जमिनीखालून गेली, परत! पोल उभारण्यात आले, परत. वायरिंग झाले परत. परत सगळे ठप्प.

आठ दिवसांपूर्वी नवा पिवळा दिवा बसला. ह्यावेळी तो पाठमोरा नव्हता! माझ्याकडे तोंड करून होता… संध्याकाळी दिवा लागला. रात्री अकराला बरोबर बंद होणार! पहाटे बरोबर एक-दोन तास लागणार. परत बंद होणार. दूर असला तरी त्याचा उजेड माझ्या घरात पुष्कळ आहे. आता मला खिडकी खुली ठेवून अंधाराची चैन मात्र करता येणार नाही. कोणीतरी सक्तीने काही तास पिवळा भडक दिवा लावलेला आहे आम्ही दोघेच आहोत. आणि आमचीच पंगत बसणार ….. मनात!

– प्राची पाठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)