चासकमान अंतर्गत 10 वाड्यावस्त्यांसाठी एसटी सुरू

राजगुरुनगर – खेड तालुक्‍यातील चासकमान धरणांतर्गत कहु, कोयाळी आणि साकुर्डी गावासह दहा वाड्या-वस्त्यांसाठी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली. 1991पासून दळणवळणासाठी रस्ता नसल्यामुळे या भागातील शालेय विद्यार्थी, रुग्णांचे आणि ग्रामस्थांचे मोठे हाल होत होते. चास कमान धरणाच्या जलसाठ्यामुळे विस्थापित झालेल्या या गावातील नागरिकांचा प्रश्‍न सुटणार आहे.

खेड तालुक्‍यातील चासकमान धरणात पाणीसाठा सुरू झाल्यानंतर कहु, कोयाळी आणि साकुर्डी गावासह दहा वाड्यावस्त्यांचा दळणवळणाच्या मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. यात सर्वाधिक फटका विद्यार्थी वर्गाला बसला होता. त्यातही मुलींच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर होता. शिक्षणासह नोकरदार व गावातील शेतमाल बाजार नेण्यासाठी गेली अनेक वर्षे होडीचा प्रवास त्यांना करावा लागला. या गावातील ग्रामस्थांनी गेली अनेक वर्षे यासाठी संघर्ष केला आहे. आज एसटी बस याभागातील नागरिकांसाठी सुरू झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. गेली अनेक वर्षांपासून या भागातील गावे आणि त्यांच्या वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांची चास कमान धरणाच्या जलसाठ्यामुळे जाण्या-येण्याची अडचण होती. रस्ता नव्हता त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती. आमदार सुरेश गोरे यांनी टोकेवाडी ते साकुर्डी आणि साकुर्डी ते औदरपर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत 22 किलोमीटर रस्त्यासाठी 16 कोटींचा निधी आणून यावर प्रभावी मार्ग काढला. रस्ता साकुर्डीपर्यंत मजबूत, रुंदीकरणासह डांबरीकरणाची कामे पुर्णत्वाकडे होत आली आहेत.

रस्त्याचा प्रश्‍न तब्बल 28 वर्षांनी मार्गी लागल्यानंतर या भागातील नागरिकांसाठी राजगुरुनगर आगाराच्या वतीने राजगुरुनगर कडुस, वेताळे, चासकमान धरणमार्गे साकुर्डी एसटी बस सुरू करण्यात आली. तिचा शुभारंभ आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामदास धनवटे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख एल. बी. तनपुरे, सतीश नाईकरे, बाळासाहेब ताये, बी. के. कदम, ऍड. संभाजी मिंडे, ऍड. दिलीप बोंबले, सरपंच बंडु बोंबले, पोलीस पाटील सयाजी शिंदे, द. भि. बोंबले, आगार प्रमुख रमेश हांडे, दिलीप तापकीर, साकुर्डी गावच्या सरपंच ज्योती सुपे, उपसरपंच सुरेखा चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष तथा विभागप्रमुख सुभाष कदम, विनायक चौधरी, शाखाप्रमुख सुनिल बोंबले, रामदास निर्मळ, चेअरमन काशिनाथ लाडके, नथुराम कदम, बाळासाहेब कडलग, किरण तळपे, ज्ञानेश्‍वर कंद, ऍड. संतोष दाते, मधुकर गिलबिले गुरुजी उपस्थित होते. यावेळी तीस वर्षानंतर या भागात एसटी सेवा सुरु झाल्याने महिलांनी मिठाईचे वाटप केले. प्रास्ताविक रोहिदास सुपे यांनी केले तर पोलीस पाटील मारुती चौधरी यांनी आभार मानले.

खेड तालुक्‍यातील अनेक गावे विकासापासून वंचित होती. त्या गावांची आमदार दत्तक आदर्श गावमध्ये निवड केली आहे. तालुक्‍यात दत्तक आमदार 11 आदर्श गावे निवडण्यात आल्याचे राज्यातील एकमेव खेड तालुका ठरला आहे. कर्जत- वांद्रे मार्गे भीमाशंकर रस्त्यासाठी अभयारण्याची आडकाठी दूर करण्यात आली आहे.
– सुरेश गोरे, आमदार खेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)