‘अहिंसा’ एक सहकार कुटुंब

स्व. श्रीमंत छ. अभयसिंह महाराज यांची मी कार्यकर्ता असल्याने मनात सातत्याने सहकारातून समाजोपयोगी काम उभा करण्याचा विचार घोळत असे. त्यातूनच सहकारातून सेवा करण्यात यावी अशी भावना उराशी बाळगून सन 2009 मध्ये म्हसवड (ता. माण) येथे अहिंसा नागरी सहकारी पतसंस्था सुरू करण्यात आली. पतसंस्थेस सोळा वर्ष पूर्ण होत असतानाच सोळा कोटीच्या ठेवी आहेत. हा योगायोग म्हणावा लागेल. त्याप्रमाणेच 12 कोटी 19 लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सतत अ वर्ग व सभासदांना डिव्हिडंट वाटप करण्यात येते.

कायमच्या दुष्काळी परिस्थितीतही आर्थिक क्षेत्रात अहिंसा पतसंस्था सक्षमपणे काम करीत आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांचे संसार उभे करण्यात यश आले आहे. असंख्य तरूणांना व्यवसाय सुरू करण्याची संधी पतसंस्थेने उपलब्ध करून दिली. अनेकांच्या घर बांधण्याच्या स्वप्नाची पूर्ती अहिंसेने कमी व्याज दरात कर्ज देवून केली.

आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला क्षेत्रातील अनेक विध उपक्रमास अहिंसा पतसंस्थेकडून केल्या गेलेल्या योगदानामुळे अहिंसा पतसंस्थेचे नाव सर्वदूर पोहचले आहे. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा उच्च परीक्षेतून यश मिळवण्याचा तसेच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्‍ती व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्याचा सत्कार पतसंस्थेच्यामार्फत करण्यात येतो. या सत्कारातून अनेकांना प्रेरणा मिळावी अशी आमची संकल्पना आहे.

पतसंस्थेने स्व. सुभाषचंद्र दोशी अहिंसा शिष्यवृत्ती सुरू केली असून यातून गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेवून त्याच्या शिक्षणाचा खर्च केला जातो. तसेच शाळेसाठी दररोज 7 ते 8 किलोमीटर ज्या विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते अशांना मोफत सायकल वाटप दरवर्षी करण्यात येते.

म्हसवड परिसरातील अनेक शैक्षणिक संस्थांना गरजेनुरूप आर्थिक सहाय्य करण्यात येते. नैसर्गिक आपत्तीत अहिंसा पतसंस्थेने सढळ हाताने मदत केली आहे. आरोग्य शिबिर आयोजित केली आहेत. तसेच अनेक गरीब रूग्णांना आर्थिक मदत करून त्यांना दिलासा देण्याचे काम पतसंस्थेने केले आहे. दरवर्षी पतसंस्थेकडून आदर्श शिक्षकांना अहिंसा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

अहिंसा पतसंस्थेची मुख्य बाजारपेठेत स्वमालकीची जुन्या पध्दतीची मात्र आकर्षक इमारत आहे. संस्थेच्या प्रथमदर्शनी सहकार ध्वजाचे भितीचित्र आहे. जेणेकरून येथे येणाऱ्या सर्वांना सहकाराची आठवण व्हावी तेथे काम करणाऱ्या संचालक मंडळास व कर्मचाऱ्यांना सहकारात सहकार ध्वज पाहून निःस्वार्थीपणे व पारदर्शक काम करण्याची प्रेरणा मिळावी.
वॉटरकप स्पर्धेत माण तालुक्‍यातील अनेक गावे दरवर्षी भाग घेत असतात. अशा गावांना जलसंधारणाची कामे श्रमदानातून केली जातात. त्यात अहिंसा पतसंस्थेचे कर्मचारी व संचालक मंडळ प्रत्येक ठिकाणी दोन तास श्रमदान करतात व आर्थिक मदत ही अहिंसा करत असते.

जनावरांच्या छावणीत ही गोळी पेंड वाटप करण्यात आले आहे. पशुधन जगले पाहिजे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन अहिंसा पतसंस्थेने मदत केली आहे. तसेच पक्षी व झाडे जगली पाहिजेत यासाठी काम करणाऱ्या रोहित व रक्षा बनसोडे यांना मानवतेच्या भुमिकेतून आर्थिक सहाय्य देण्यात आले. गेली सोळा वर्ष सहकारातून सेवा करत हे अहिंसाचे सहकार कुटुंब खुप मोठे झाले असून या कुटुंबात असंख्य सदस्य आनंदाने व गुण्यागोविंदाने नांदत आहेत. सहकारातील अहिंसा पतसंस्था हे सदृढ कुटुंब आहे. अहिंसा पतसंस्थेचे हे सहकार कुटुंब सदृढ करण्यात संचालक मंडळ, कर्मचारी व असंख्य हितचिंतकाचे योगदान आहे.

– नितिन दोशी (कुटुंबप्रमुख, अहिंसा पतसंस्था नागरी सहकारी पतसंस्था, म्हसवड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)