हडपसर पोलिसांनी केले जेरबंद ः 7 दुचाकी केल्या हस्तगत
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 24 – परजिल्ह्यातील सराईत गुन्हेगार दिवसा हॉटेलमध्ये वेटरचे काम करून रात्री दुचाक्यांची चोरी करत होता. मात्र हडपसर पोलिसांच्या नाकाबंदीत सापडल्यावर पळून जात असताना त्याला जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मुकेश ऊर्फ दादा श्याम शिंदे (रा. हडपसर, मुळ रा. उस्मानाबाद) असे अटक आरोपीचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी गुन्ह्यांस प्रतिबंध करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. तसेच काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी आरोपी दुचाकीवरुन शनिमंदिराकडून भरधाव वेगात येताना दिसला. त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळून जाऊ लागला. मात्र, थोड्याच अंतरावर पोलिसांनी त्याला शिताफिने पकडले. त्याच्या गाडीची तपासणी केली असता ती चोरीची असल्याचे आढळले. त्याच्याविरुद्ध उस्मानाबाद जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. तो तेथून पळून येऊन पुणे शहरात वेटरचे काम करत होता. तसेच दुचाक्यांच्या चोऱ्याही करत होता. त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून जप्त करण्यात आलेल्या दोन दुचाकींचा तपास सुरू आहे.
या पथकाने केली कामगिरी
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक हिमालय जोशी, सहायक पोलीस फौजदार युसुफ पठाण, पोलीस संपत औचरे, पोलीस हवालदार राजेश नवले, पोलीस नाईक सैदोबा भोजराव, पोलीस नाईक विनोद शिवले, पोलीस शिपाई नितीन मुंढे, अकबर शेख, शाहिद शेख, शशिकांत नाळे यांच्या पथकाने केली,