जि. प. सदस्य झुरंगे यांची माहिती ः मंगळवारचा मुहूर्त
जेजुरी -नाझरे जलाशयावरून कोळविहिरे, पारगाव-माळशिरस प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना येत्या 13 ऑगस्टपासून नव्याने सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे यांनी दिली.
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांचा पुरंदर तालुक्यातील बेलसर-माळशिरस गटात गाव भेटीचा दौरा सुरू होता. यावेळी या गटातील 17 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या पारगाव माळशिरस प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून पिण्याचे पाणी मिळावे अशी मागणी करण्यात येत होती. जगताप यांनी आपला गाव भेटीचा दौरा अर्धवट सोडून थेट नाझरे जलाशयाला भेट दिली. त्यांच्या सोबत या गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, सोनाली यादव, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, पारगाव माळशिरस योजनेच्या देखभाल समितीचे अध्यक्ष बापू भोर, जेजुरीच्या नगरसेवक उपस्थित होते. योजनेच्या दुरुस्तीच्या कामाची त्यांनी पाहणी केली.
ऐन पावसाळ्यात योजना बंद राहिल्याने पारगाव, माळशिरस, पोंढे, नायगाव कोळविहिरे परिसरातील 20 गावांना वंचित ठेवता कामा नये. योजनेतून त्वरित पाणी पुरवठा केला जावा अशा सूचना संजय जगताप यांनी संबंधितांना दिल्या. जिल्हा परिषदेच्या वतीने या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे 30 लाख रुपये दिलेले आहेत. दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू होते. एकीकडे नाझरे जलाशयात पाणी आहे; मात्र दुरुस्तीच्या कामामुळे योजनेवरील 20 गावांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी संजय जगताप यांच्याकडे आल्या. त्यांनी थेट योजनेच्या पंप हाऊसवर जाऊन पाहणी केली, दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराला बोलावून संपूर्ण माहिती घेतली आहे. त्यानुसार येत्या 13 ऑगस्टला या योजनेतून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या उपस्थितीत पाणी पुरवठ्याचा शुभारंभ केला जाणार आहे. अशी माहिती झुरंगे यांनी दिली त्याच बरोबर जेजुरी नगरपालिकेच्या नाझरे जलशयावरील पंप हाऊसचीही दुरुस्ती व विद्युत मोटारी बसवण्यात आल्या आहेत. तीही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी सांगितले.