प्रशासकीय इमारतीला लागूनच साचलाय कचऱ्याचा ढिगारा
भोर-भोर नगरपालिकेने नुकताच स्वच्छ भारत अभियानात स्वच्छतेचा 6 कोटी 25 लाख रुपयांचा पुरस्कार मिळवला असून भोर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बंद असलेल्या व्यापारी गाळ्याचे दारातच कचऱ्याचा ढिगारा गेल्या अनेक दिवसांपासून साठलेला आहे. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीने हा कचरा कुजला असून परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने भोर नगरपालिकेला स्वच्छ नगरपालिका कसे म्हणायचे असा सवाल या कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर राहणारे नागरिक करीत आहेत.
भोर नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील व भोर शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भोर नगरपालिकेने लाखो रुपये खर्चाची डंपिंग व्यवस्था केली असून, या डंपरने शहरातील कचरा उचलण्यात येतो. मात्र भोर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे भोर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीला लागूनच असलेल्या कचऱ्याचे ढिगाऱ्याकडे लक्ष नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समोर राहणाऱ्या एका रहिवाशाने या ढिगाऱ्यातून विषारी सर्प निघत असून दोन साप मारले असल्याचे सांगितले.
भोर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार नुकत्याच रुजू झालेल्या डॉ. विजयकुमार थोरात यांनी घेतला असून त्यांनी या गंभीर विषयाची दखल घेऊन हा सडलेल्या कचरा तात्काळ हटवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जवळपासचे रहिवासी करीत आहेत. भोर नगरपालिकेच्या विषय समित्यांवर सभापती पदावर चारही महिलांचीच वर्णी लागली असून आरोग्य समितीच्या सभापतींनी याकडे लक्ष घातले पाहिचे तरच भोर नगरपालिकेला स्वच्छ सुंदर नगरपालिका म्हणता येईल, असा दबक्या आवाजात नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत.