पिंपरी – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या युवराज दाखले याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यावेळेस त्याच्या पत्नीनेच त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
युवराज भगवान दाखले (वय 35), सासरे भगवान येडबा दाखले (वय 60), सासू (वय 56, तिघे रा. तापकीर चौक, काळेवाडी), नणंद (वय 36), रामचंद्र दशरथ शेंडगे (वय 40, दोघे रा. वाकड) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत विवाहितेने सोमवारी (दि. 12) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 20 नोव्हेंबर 2008 ते 12 एप्रिल 2021 या कालावधीत तापकीर चौक, काळेवाडी येथे घडली.
आरोपींनी विवाहितेकडे वेगवेगळ्या कारणांसाठी तसेच फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 50 लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला असता आरोपींनी तिला शिवीगाळ व मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
युवराज दाखले याने 2 मार्च रोजी युट्युबवर राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामी करणारा मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित केला.
प्रसारित केलेल्या व्हिडिओचा कुठल्याही प्रकारचा पुरावा दाखले याच्याकडे नसताना हा व्हिडिओ प्रसारित केला. यामुळे एका महिलेने त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणाचे थेट विधानसभेत पडसाद उमटले होते. त्यानंतर पोलिसांनी दाखले याला अटकही केली होती.