- सरबत, रसाळ फळांनादेखील मागणी
पिंपरी – मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान महिन्यास बुधवारपासून (दि.14) सुरुवात होत आहे. यानिमित्त रमजानचा उपवास सोडण्याकरिता आवश्यक असलेल्या खजूर शहरातील ड्राय फ्रुट दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. लॉकडाऊनमध्ये कमी पडू नये, याकरिता खजुरांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे.
दरवर्षी रमजान महिन्याला सुरुवात होण्यापूर्वी सजणाऱ्या बाजारपेठा यावर्षी कडक निर्बंधांमुळे सजल्याच नाहीत. मात्र, त्यापूर्वीच विविध प्रकारचे खजूर बाजारपेठेत दाखल झाले होते. अज्वा व मगजोल खजूर सर्वाधिक महाग असूनही त्यांना पसंती दिली जात आहे.
लॉकडाऊनची शक्यता लक्षात घेत, मुस्लिम बांधवांनी काही दिवस अगोदरच खरेदी केली. आहे. या खजूरामध्ये अज्वा, कलमी, मदीना, मगजोल, फरत, सुलतान, केमिया, रुकसार, हसना, हार्मोनियम, मुज्जरब, बुरारी, गुड, अल्जेरियन असे अनेक प्रकारचे खजूर विक्रीस उपलब्ध आहेत. याशिवाय रमजानचे उपवास सोडण्याकरिता रसदार फळे व विविध खाद्यपदार्थांची देखील विक्री झाली आहे. खाद्य पदार्थांशिवाय अत्तर, टोपी, सुरमा तसेच इबादतसाठी आवश्यक साहित्याची देखील मोठी विक्री झाली आहे.
रमजानचा उपवास सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक खजुराची खरेदी करतात. मदीना या खजूरला सर्वात जास्त मागणी असते. त्यात सर्वात महाग दराने विकला जाणारा अज्वा व मगजोल खजूर बाजारपेठेत उपलब्ध आहे. सुमारे 250 रुपयांपासून ते 1800 रुपये किलो अशा किमतीचे खजूर विक्रीस उपलब्ध आहेत. मुस्लिम बांधव सायंकाळी उपवास सोडण्यासाठी प्रथम खजूर खाऊन उपवास सोडतात. त्यामुळे रमजान महिन्यात खजूरला महत्व आहे. कलमी, फरद या इराणी खजुराला ग्राहकांची मागणी आहे. चिखली, नेहरुनगर, दापोडी आदी भागातून मोठया प्रमाणावर ग्राहकांनी खजूर खरेदी केले आहेत.