नगर – बॅंक, पतसंस्थांकडे कर्ज घेण्यास गेल्यास कागदपत्रांची पूर्तता करताना नाकी नऊ आणले जाते. खासगी व्यक्ती (सावकार) पाच ते दहा हजार रुपयांचे कर्ज देताना कोरे धनादेश घेतात. तर दुसरीकडे ऑनलाइन कर्ज देताना कुठल्याही कागदपत्रांची मागणी न करता केवळ ऍप्लिकेशन डाउनलोड करायला लावून तरुणाईला आपल्या जाळ्यात ओढले जाते. त्या ऑनलाइन कर्जाची परतफेड केल्यानंतर ब्लॅकमेलिंग करून वेठीस धरण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.
मोबाईल ऍपवर कर्ज देण्याचा सतत मॅसेज पाठविला जातो. सहज कर्ज मिळत असल्याने खास करून तरुण त्याला बळी पडत आहेत. मात्र, येथूनच ब्लॅकमेलिंगचा धंदा तेजीत येत आहे. बदनामीच्या भीतीने मनमानी रक्कम अदा करूनही पैसे वसुलीचा तगादा सुरुच राहत असल्याने अनेक कुटुंब दहशतीच्या सावटात वावरत आहेत. ऑनलाइन कर्ज घेताना फ्रॉडर्सकडून ऍप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितले जाते.
संबंधित गरजू तत्काळ कोणतीही खातरजमा न करता ऍप्लिकेशन डाउनलोड करतो. यावेळी आपल्या मोबाइलमधील ऍक्सेसवर फ्रॉडर्स ताबा मिळवितात. कर्ज तर मिळते, ठराविक कालावधीत ते परतही केले जाते. त्यानंतरही वसुलीचा तगादा लावला जातो. गॅलरी व कॉन्टॅक्ट लिस्टमधील क्रमांकावर अश्लील छायाचित्र पाठवून वेठीस धरले जाते. मोबाइलमधील फोटो गॅलरीचा ब्लॅकमेलिंग करण्यासाठी सायबर चोरट्यांकडून वापर केला जातो.
हा प्रकार थांबविण्यासाठी फ्रॉडर्सकडून अवास्तव पैशाची मागणी केली जाते. परराज्यात बसून हा ब्लॅकमेलिंगचा गोरखधंदा चालत आहे. त्यामुळे कुणी सहज ऑनलाइन कर्ज देण्याचे आमिष दाखवित असेलतर त्यावर विश्वास ठेवू नये. अन्यथा फसवणुकीचा हा फास असाच वाढत जाण्याची भीती आहे. त्यामुळे ऑनलाईन कर्ज प्रकरणापासून तरुणाईने दूर रहावे.
वेळीच व्हा सावधान
मोबाइलवर दिवसभरात विविध मॅसेज येतात. कर्ज घेण्यासाठी तरुण अगदी पुढे येतात. सायबर चोरट्यांसाठी तरुणाई सॉफ्टटार्गेट ठरत आहेत. एकच नव्हे तर दहा ते वीस ऍप्लिकेशनवरून कर्ज घेण्यापर्यंत मजल जात आहे. यातच कर्ज वसुलीतून ब्लॅकमेलिंगचा फंडा अवलंबल्या जात असल्याची घटना वारंवार घडत आहेत.
“आजच्या तारखेत कुणीही सहज कर्ज देत नाही, हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. बॅंका, पतसंस्था, मल्टिस्टेट येथूनच विश्वासाने कर्जाचे व्यवहार करावेत. ऑनलाइन कर्ज घेताना सावधगिरी अधिक बाळगणे आवश्यक आहे. कोणतीही लिंक ओपन करून ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याचे टाळावे,” असे श्री रेणूका माता मल्टिस्टेटचे अध्यक्ष प्रशांत भालेराव
म्हणाले.