तुझ्या उसाला लागंल बिबट्या…! कळंब, एकलहरे, चांडोली परिसरात धुमाकूळ

– संतोष वळसे पाटील

मंचर -“तुझ्या उसाला लागंल कोल्हा…’ असे एक गाणे आहे; परंतु त्यात बदल करून आता “तुझ्या उसाला लागंल बिबट्‌या…, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आंबेगाव तालुक्‍यातील जवळपास सर्वच गावांमध्ये बिबट्‌यांचा वावर वाढल्याने दिवसा व रात्री, अपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी व राखण करण्यासाठी शेतकऱ्यांना जाणे धोक्‍याचे झाल्याने शेतीकामे रेंगाळली आहेत.

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कळंब, एकलहरे, चांडोली इत्यादी ठिकाणी बिबट्याने धुमाकुळ घातला असून, या परिसरातून बिबट्याने कुत्री, शेळ्या-मेंढ्‌या, वासरू आदींचा फडशा पाडला आहे. याठिकाणी वनविभागाने पिंजरे लावलेले आहेत; परंतु त्या पिंजऱ्यामध्ये बिबटे जेरबंद होत नाहीत. यासाठी वन विभागाने मोकळे पिंजरे न ठेवता त्यामध्ये सावज ठेवून त्यांना जेरबंद करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. सध्या तर दिवसा देखील बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे, त्यामुळे शेतीला पाणी देणे किंवा बाजरीची राखण करणे शेतकऱ्यांना धोक्‍याचे झाले आहे. ऊस पिकाला पाणी देण्यास जाण्यासाठी शेतकरी बिबट्याच्या भीतीने धजावत नाही. परिसरामध्ये बाजरी, ऊस, तरकारी पिकाचे मोठे क्षेत्र आहे. नदीला बारमाही पाणी असल्याने शेतकरी विविध पिके घेत आहेत. मात्र, बिबट्याच्या भीतीने पाणी देण्यासाठी शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत.

आंबेगाव तालुक्‍यात सध्या उसाची तोड पूर्ण झाली असल्याने बिबट्यासाठी असलेली लपण क्षेत्र मोठ्‌या प्रमाणावर कमी झाले आहे. उसाच्या क्षेत्रामध्ये बिबट्याला लपण्यास वाव कमी झाल्याने आणि उन्हाची तीव्रता वाढल्याने बिबट्या मानवी वस्तीकडे भक्ष्य व पाण्याच्या शोधासाठी येत असल्याचे दिसून येत आहे. वनखात्याने वन्य प्राण्यांसाठी जंगली भागात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी वन्य प्राणी संघटनांनी केली आहे. याबरोबरच वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, माजी सभापती वसंतराव भालेराव, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, सरपंच राजश्री भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी केली आहे.

कळंब, एकलहरे, चांडोली आदी परिसरात बारमाही पाणी व झाडे झुडपे आहेत. मात्र, वाढत्या उष्णतेने बिबट्या पाण्यासाठी मानवी वस्तीकडे दिवसाही येऊ लागले आहेत, त्यामुळे वनखात्याने पाणवठ्याची सोय केल्यास बिबट्या मानवी वस्तीकडे येण्याचा थांबेल, त्यासाठी जंगली भागात पाणवठे बांधून तेथे पाण्याची सोय वनविभागाने करावी, अशी मागणी
– उषा कानडे, सभापती, पंचायत समिती

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.