कांदा वधारला.. भरणीला वेग…

वजन व नासाडी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम

चासकमान – कांद्याला या वर्षी चांगला भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कांदा तसाच आरणीला लावून साठवून ठेवला होता; मात्र कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे साठवलेला कांदा भरण्यास सुरुवात केली आहे. तरीही कांदा उत्पादक शेतकरी शासनावर नाराज असलेला दिसून येत आहे.

यापूर्वी विकलेल्या कांद्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आधीच नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. आता भाव वाढून उपयोग काय होणार? असा सवाल उमटत आहे. साठवून ठेवलेला कांदा उन्हामुळे तापून खराब होऊन त्याची नासाडी झाली आहे. यामुळे 100 पिशवीमागे 10 पिशव्या खराब झाल्या आहेत. आता बाजारभाव वाढला तरी त्याचा उपयोग होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. खेड तालुक्‍यातील आखरवाडीमध्ये शिवाजी मुळूक याने अर्ध्या एकरात 80 पिशवी कांदा पिकवला; मात्र योग्य बाजारभाव नसल्याने तो साठवून ठेवला होता.

आता दरात किंचित वाढ झाल्यामुळे ते आता कांदा विक्रीस पाठवणार आहे; मात्र जानेवारीमध्ये काढलेले पीक 5 महिने तसेच ठेवल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली आहे. त्यामुळे शासनाने हमीभाव ठरवून द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यापेक्षा प्रतिकिलो 10 रुपये हमीभाव शासनाने ठरवून द्यावा. अनुदानाची भिक घालण्यापेक्षा मालाला हक्काचे दर ठरवून द्या. जेणेकरून शेतकरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळवू शकेल.
– शिवाजी मुळूक, शेतकरी आखरवाडी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.