पिंपरी – तरूणीने किरकोळ कारणावरून ठरलेले लग्न मोडले आणि तरुणाला मानसिक त्रास दिला. या कारणावरून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी संबंधित तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत कृष्णा तळपे (वय 26, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी उषा बाळू सरोगदे (वय 23, रा. खडकुंबे, ता. जुन्नर, जि. पुणे) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कृष्णा केशव तळपे (वय 55, रा. घंगाळदरे, ता. जुन्नर) यांनी रविवारी (दि. 6) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक अनिरूद्ध सावर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसीमध्ये उषा आणि भरत हे दोघे वेगवेगळ्या कंपनीत कामाला होते. मयत भरत याचा विवाह उषा हिच्याशी ठरला होता. मात्र काही दिवसानंतर तिने किरकोळ कारणावरून लग्नास नकार दिला. त्यानंतर उषा हिने 21 जुलै ते 31 जुलै 2020 या कालावधीत भरत यास मानसिक त्रासही दिला. या त्रासाला कंटाळून राहत्या घरी भरत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या मृत्यूस उषा हिच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.