शहरात साधेपणानेच उत्सव झाला साजरा
पुणे – करोनाच्या संकटामुळे नागरिकांनी यंदा पर्यावरणपूरकतेची कास धरत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. एकूणच या सगळ्या काळात हवेतील प्रदूषण जसे कमी झाले तसे कचऱ्यातून होणारे प्रदूषण कमी झाले आणि या काळात 113 टन कचरा तोही पर्यावरणपूरक जमा झाला.
भाविकांनी बाप्पाला वाहिलेली फुले आणि अन्य प्रासादिक वस्तूंची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावली जाण्याकरिता दि. 24, 28 व 30 ऑगस्ट तसेच दोन सप्टेंबर या दिवशी, स्वच्छ आणि पुणे महपालिका यांच्या संयुक्त विद्यमातून नागरिकांच्या दारातूनच निर्माल्य उचलण्याची मोहीम राबवली गेली. त्यातून एकूण 113 टन निर्माल्य उचलले गेले. वरीलपैकी कोणत्याही एका दिवशी नागरिक “स्वच्छ’च्या कचरावेचकांकडे निर्माल्य आणि विसर्जनाच्या अन्य वस्तू स्वतंत्रपणे सुपूर्द करायचे ज्यायोगे त्या अन्य कचऱ्यामध्ये मिसळल्या जाणार नाहीत.
त्यानुसार या वस्तू स्वतंत्रपणे हातळल्या गेल्या आणि त्यांचे स्वतंत्रपणे कंपोस्टिंगही केले गेले. यामुळे उत्सवाचे वातावरण तर अबाधित राहिलेच पण नागरिकांकडून अनेक पर्यावरण-स्नेही पद्धतींचा अवलंब केला गेला. उदाहरणार्थ, हाताने बनवलेल्या लहान मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन, शक्य तेवढी पर्यावरण स्नेही सजावट आणि घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करणे आदी.
निर्माल्य वेगळे गोळा करून ठरावीक दिवशी देण्यासंदर्भात सुमारे 30 लाखांहून अधिक नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ते गोळा करून त्याचे कंपोस्टिंग केले गेले. ही व्यवस्था 10 दिवस सुरू होती. खास गाड्यांमधून हे निर्माल्य गोळा करण्यात आले.