‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हणतात. हे अन्न ग्रहण करताना आपण अन्न बनविणाऱ्या व्यक्तीचे आभार मानलेच पाहिजेत. याशिवायही आपण जेवताना नेमकं काय करतो? चारचौघात जेवताना कसे जेवतो, यावरूनही आपल्याबद्दल चांगले किंवा वाईट मत बनत असते. जेवण करण्याचे काही अलिखित नियम आहेत का? तर हो, जेवताना काय करावे आणि काय करू नये, यासंदर्भात अनेक नियम आहेत. ते काय आहेत, हे जाणून घेतलेच पाहिजेत.
१) जर हात न धुवता जेवायला बसताय तर मग प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला मागुनच घ्यावी, स्वतःचा न धुतलेला हात पोळीच्या डब्ब्यात किंवा बाकी कुठल्या वस्तूला लावू नये.
२) जेवताना मधेच उठुन पाणी घ्यायला जाणे म्हणजे तहान लागली की विहीर खोदण्या सारखे आहे.
३) खाण्यात चुका काढण्यासाठी जेवणानंतर वेळ दिला तरी जमतं. जेवताना जेवणाची प्रशंसा करणे हे आवर्जुन मान्य आहे.
४) जेवताना तोंडाचा मचमच चकचक आवाज केल्याशिवायदेखील पचन होतं.
५) जेवताना काही चांगलं बोलायचं सुचत नसेल तरीही हरकत नाही, पण वाद होतील अशा गोष्टी तोंडातून बाहेर येत असतील तर त्या जेवणासोबतच गिळून टाका.
६) जेवताना जास्त प्रमाणात अन्न सांडायची सवय असेल तर फरशीवर ताट मांडलेले जास्त सोयीस्कर ठरेल.
७) जेवणाच्या सुरवातीला आपल्या मूडचा अंदाज घेऊन काही पदार्थ काढुन ठेवायचा असेल तर काढलेलं उत्तम. कारण तुमच्या खाण्याविषयीच्या तक्रारी ऐकत जेवायला कुणालाही रस नाही किंवा खाणं कमी आणि उष्टे अन्न जास्त हे समीकरण टाळावं.
८) लोकांच्या ताटाकडे इतकं लक्ष नका देऊत की, त्या व्यक्तीला तुमच्या नजरेनेच नंतर ऍसिडिटी होईल. आणि अशा अजब पद्धतीने जेवण करू नका की लोकांचं लक्ष तुमच्या ताटाकडे वळेल.
९) जेवताना जांभई देणं, रिकामा असलेला हात केसांना, पायाला किंवा आणखी कुठे लावणं हे वाईट लक्षण प्राण्यांमध्ये देखिल नाही.
१०) कोणाला काय हवंय हे पाहताना इतका कटाक्ष नका ठेऊ की त्या व्यक्तीला तुमच्या थेट प्रक्षेपणाने जेवणच करू वाटणार नाही.
११) चपाती एका हाताने कशी मोडुन खावी हे शिक्षण लहानपणी दिलं नसेल तर आता तरी घ्यावंच. एका हातात चपाती घेऊन दुसऱ्या हाताने खाणे हे करायचं असेल तर एकट्यात जेवा.
१२) पदार्थांमधील कांदा, टोमॅटो, कडीपत्ता आणि असे बरेच सामग्री काढुन निवाडा करून जेवण्याची सवय खूप सामान्यतः आढळत असेल तरी स्वतः ला लावू नये.
१३) स्वतःचे जेवण बाजुच्या व्यक्तीवर अवलंबून न ठेवता स्वतः च्या आहारावर ठेवा. शेजारचा चार घास जेवला म्हणुन आपल्या मोठ्या शरीरालाही तितकंच पुरेसं असेल असे नसते. खाताना लाजणारा उपाशीच झोपतो.
१४) जेवताना अन्न गळ्याखाली उतरण्यासाठी मोबाईल दहा वेळा पाहण्याची गरज नसते.किंवा टीव्ही पाहतच जेवणाला चव येते असंही नाही.
१५) एकतर तोंडातील घास पूर्ण खा किंवा बोला. दोन्हीही एकदाच आटोपून घेऊन फार मोठे जागतिक प्रश्न सोडवायला आपल्याला जायचं नाहीये. तुम्ही कसा घास खाताय हे पाहायला नक्कीच कुणाला आवडणार नाही.
१६) डायनिंग टेबलवर जेवताना शेजारच्या व्यक्तीला कोपऱ्याने धक्का लागणार नाही हे बघणे देखील सामान्य बुद्धी जागेवर ठेवणं आहे.
१७) शिंकणे, खोकला येणे या गोष्टी येणं आपल्या हातात नसेल तरीही आपण आपल्या परीने आपले नैसर्गिक आवाज व पदार्थ जमेल तितके अन्नापासून दूर ठेवावे. लोकांना स्वतः चा ढेकर ऐकवण्यात काही कला नसते हेही लक्षात घ्या.
१८) हॉटेलमध्ये जेवायला बसायच्या ठिकाणीच केस विंचरणे व लिपस्टिक लावत बसणे खरंच अमान्य आहे.
१९) जगात हात धुण्यासाठी कुठलीच जागा राहिली नसेल तरच जेवलेल्या ताटात हात धुवा. काही जणांना हॉटेल मध्ये जेवण झाल्यावर ताटातच हात धुवून नंतर टीशु पेपरने पुसून ते टीशु ओल्या ताटात फेकण्याची वाईट सवय असते.
२०) जेवण हे एक प्रकारचे मेडिटेशन मानले जाते. मन लावून जेवण करण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. प्रसन्न मनाने जेवण करण्याने मानसिक शांती व समाधान मिळतं हे लक्षात घेऊन जेवण करावं. तोंड खराब करून, चीडचीड करत जेवण्याचे दुष्परिणाम शरीरावर नकळत होतात.
२१) जमेल तेव्हा जेवणानंतर आईसक्रीम खावे. हा अलिखित नियम पाळण्याने व्यक्तीला लवकर अन्न पचतं म्हणे.
२२) जेवणाचे आणि स्वतः चे फोटो काढण्यात व्यस्त राहणे म्हणजे सोबतच्या व्यक्तींचा अपमान असतो हे लक्षात ठेवावं.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा