मुंबई – बॉलिवूडमध्ये घराणेशाहीवरून अनेक सेलेब्रिटींवर टीका करण्यात आली. अभिनेता शाहिद कपूर याला देखील घराणेशाहीवरून ट्रोल करण्यात आले होते. यावर शाहीदने संताप व्यक्त केला आहे. शाहीदचे आई आणि वडील दोघे सिनेसृष्टीत कलाकार आहेत. अभिनेते पंकज कपूर हे त्याचे वडील आहेत तर अभिनेत्री नीलिमा अझीम या शाहीदच्या आई आहेत. त्यांच्यामुळे शाहिदला इंडस्ट्रीत यशस्वी होण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नसल्याचे अनेकांनी म्हंटले. यालाच आता शाहीदने प्रत्युत्तर दिले आहे.
एका मुलाखतीदरम्यान शाहिद म्हणाला की, “माझे वडील अभिनेते असल्याने मला इंडस्ट्रीत सहज संधी मिळाली असेल, असे लोकांना वाटते. पण हे ऐकून मला खूप वाईट वाटते, कारण माझा संघर्ष तुम्हाला माहित नाही. माझे वडील पंकज कपूर असल्याने मला सगळं सहज मिळाले असे नाही. मी त्यांच्यासोबत राहतही नाही. मी तर माझ्या आईसोबत राहतो. माझे वडील मला असं कधीच बोलणार नाहीत की मी अमुक व्यक्तीला फोन करतो आणि तू जाऊन भेट. त्यांच्याकडून मदत न मागण्याचा माझाही स्वाभिमान आहे. गेल्या 20 वर्षांत मी इंडस्ट्रीत प्रचंड मेहनत घेत संघर्ष केला आहे.”
दरम्यान, शाहिदने वयाच्या 22 वर्षी ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याआधी त्याने ‘ताल’ आणि ‘दिल तो पागल है’ या चित्रपटांतील गाण्यांमध्ये तो बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले . करिअरच्या सुरुवातीला मोठा संघर्ष करत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट केले. त्याच्या जब वी मेट, उडता पंजाब, कबीर सिंग या चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.
शाहिदने बऱ्याच कालावधीनंतर ‘फर्जी’ ही हिट कलाकृती दिली. त्यानंतर आता ‘ब्लडी डॅडी’मध्ये देखील तो आगळीवेगळी भूमिका साकारत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ब्लडी डॅडीमध्ये शाहिद कपूर, रोनित बोस रॉय, डायना पेंटी, संजय कपूर, राजीव खंडेलवाल, अंकुर भाटिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 9 जून 2023 रोजी जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.