नवी दिल्ली – सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओडिशा रेल्वे अपघातावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. एवढा मोठा रेल्वे अपघात झाला, मात्र यासाठी कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही. तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अद्याप राजीनामा दिला नसल्याचे देखील राहुल यावेळी म्हणाले.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजप नेते कधीही भविष्याबद्दल बोलत नाहीत आणि त्यांच्या अपयशासाठी नेहमी दुसऱ्याला दोष देतात. अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेले राहुल अमेरिकेतील जाविट्स सेंटरमध्ये परदेशी भारतीयांना संबोधित करत होते. ओडिशा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ त्यांनी यावेळी काही काळ मौन पाळले.
राहुल म्हणाले, “काँग्रेसची सत्ता असताना मला रेल्वे अपघात आठवतो. ट्रेनला अपघात झाला ही ब्रिटिशांची चूक आहे, असे काँग्रेसने म्हटले नाही. तत्कालीन काँग्रेस मंत्र्याने त्याची जबाबदारी स्वीकारली आणि मी राजीनामा देत असल्याचे सांगितले. मात्र आता भाजपाला ही दुघटना का झाली असं विचारलं तर ते म्हणतील यात काँग्रेसचा दोष असा टोला देखील यावेळी राहुल गांधींनी लगावला.
भाजपचे सर्व मंत्री भविष्याबद्दल कधीच बोलत नाहीत, ते फक्त भूतकाळाबद्दल बोलतात. एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला नथुराम गोडसे अशा दोन विचारधारांमध्ये भारतात लढाई सुरू असल्याचे देखील यावेळी राहुल गांधींनी म्हंटले.