नवी दिल्ली : सध्या राज्यात भोंग्यांवरून सुरु झालेल्या गोंधळामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याच दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवरचेही भोंगे उतरवले गेल्याची माहिती समोर येत होती. आता स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात धार्मिक स्थळांवरून तब्बल एक लाख भोंगे उतरवले गेले असल्याचे म्हटले आहे. राज्यात आतापर्यंत एक लाख भोंगे उतरवले गेले असून पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत कुणी करू नये, असा धमकीवजा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांसंदर्भात दावा केला की, राज्यात आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाऊडस्पीकर धार्मिक स्थळांवरून उतरवले गेले आहेत. तसेच काढून टाकलेले लाऊडस्पीकर पुन्हा लावले जाऊ नयेत, याची काळजी घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. काढलेले भोंगे पुन्हा लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
झाशीमध्ये मुख्यमंत्री योगी यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा केली, विकासकामांचा विभागीय आढावा घेतला आणि राज्यात आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाऊडस्पीकर हटवल्याचा दावा केला. शिवाय काढून टाकलेले लाऊडस्पीकर पुन्हा चालू होणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. “धार्मिक कार्यक्रम धार्मिक स्थळांच्या आवारातच मर्यादित असावेत, रस्त्यावर कोणताही उत्सव आयोजित करू नये आणि या कार्यक्रमांमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतली जावी,” योगी आदित्यनाथ म्हणाले.